Premium|Triptii Dimri : रामलीलेत हनुमानाची भूमिका ते बॉलिवूडचा प्रवास; तृप्ती डिमरीने सांगितला संघर्ष

Triptii Dimri Early Struggle : उत्तराखंडमधील गढवालपासून दिल्ली आणि मुंबईपर्यंतचा तृप्ती डिमरीचा प्रवास, रामलीलेतून सुरू झालेली अभिनयाची आवड, मॉडेलिंगचे अनुभव आणि मुंबईत कास्टिंग एजन्सींकडून मिळालेले नकार.
Triptii Dimri Early Struggle

Triptii Dimri Early Struggle

esakal

Updated on: 

पूजा सामंत

उत्तराखंडमधील गढवालची रहिवासी असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी, प्रथम दिल्ली आणि नंतर मुंबईत स्थायिक झाली. तृप्ती तिच्या व्यावसायिक जीवनात झपाट्याने पुढे जातेय. सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री तृप्ती ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या बुलबुल या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. बुलबुल तिचा तिसरा चित्रपट होता. अलीकडेच ओटीटीवर आलेल्या माँ बहनमुळे तृप्ती पुन्हा एकदा चर्चेत आली. चित्रपटसृष्टीवर आपली पकड मजबूत करत चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागलेल्या या उभरत्या अभिनेत्रीशी साधलेला संवाद...

तू उत्तराखंडची... उत्तराखंड ते बॉलिवूड हा प्रवास करणं कठीण वाटलं?

तृप्ती डिमरी : म्हटलं तर सगळंच कठीण होतं. पण आई-वडिलांचं प्रोत्साहन, भावंडांची साथ आणि माझा निग्रह यांमुळे माझं अभिनयाचं स्वप्न मी प्रत्यक्षात उतरवू शकले. मोठ्या शहरांच्या तुलनेत गढवाल खूप लहान असल्यानं पुढारलेली विचारसंस्कृती तिथं नाही. मी लहानपणी खूप लाजरीबुजरी होते. लहान गावात वाढल्यानं माझ्यात आत्मविश्वाचाही अभाव होता. मी कुणाबरोबर फारशी मिसळत नसे, बोलत नसे. पण टीव्हीवर गाणी, चित्रपट पाहून मला अभिनय करावा असं वाटत होतं. मी हळूहळू शाळेच्या स्नेहसंमेलनांतून भाग घेऊ लागले. अभिनयात करिअर करावं अशी माझी महत्त्वाकांक्षा असू शकेल हे आई-वडिलांना कधी जाणवलं नाही; त्यांनी तसा कधी विचारच केला नव्हता. हे गुपित माझ्या बहिणीला आणि भावाला ठाऊक होतं. माझे वडील आमच्या शेजारच्या गावात रामलीला आयोजित करत असत आणि त्यात मी आई-वडिलांच्या आग्रहाखातर भाग घेत असे. त्यांना माझ्यातल्या लाजाळूपणा, संकोच घालवायचा होता. एका वर्षी मी मेकअप करून चक्क हनुमानजी झाले. लुकडासुकडा हनुमान बघून हशा पिकला. त्यानंतर मात्र मी हट्टानं सीतामाई झाले. स्वतःवर भलतीच खूश होते मी. माझी स्टेज फ्राइट जाण्यास रामलीला कारणीभूत ठरली.

बारावीनंतर मी फिरोझाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तिथं मी नाटकांतून भाग घेत असे. पुढे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अरबिंदो कॉलेजमधून मी सायकोलॉजी विषय घेऊन पदवी घेतली. यादरम्यान माझा बुजरेपणा हळूहळू कमी होत गेला. पॉकेटमनीसाठी आणि आत्मविश्वास येण्यासाठी मला मॉडेलिंग करायचं होतं. काही प्रिंट कॅटलॉग मॉडेलिंग मी केलंही. तेव्हा माझ्या आई-वडिलांना माझ्या छुप्या मनसुब्याची जाणीव झाली. मग त्यांनी खुल्या दिलानं मला माझी स्वप्नं पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य दिलं. तुला फिल्म इंडस्ट्रीत यश मिळो अथवा अपयश; आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत हा विश्वास, हे मानसिक बळ त्यांनी दिलं.

दिल्लीत थोडं मॉडेलिंग करून मी मुंबई गाठली. अर्थात मुंबईत येण्यापूर्वी काही कास्टिंग एजन्सीजशी बोलून ठेवलं. माझी आई तेव्हा माझ्यासोबत आली होती. तिचं तिथं असणं हाच मला खूप मोठा मानसिक आधार होता. पण ती माझ्या संघर्षाच्या दिवसांमध्ये माझ्यासोबत सतत राहू शकत नव्हती. माझी दोन भावंडं, वडील गढवालला होते. मी दररोज नव्या कास्टिंग एजन्सीजमध्ये जात होते. अनेक नकारच मिळत होते. मग मला रडू यायचं. आई असेपर्यंत तिचा समजुतीचा, प्रेमाचा हात डोक्यावर होता... ती पुन्हा घरी गेल्यावर मी सैरभैर झाले होते.

Triptii Dimri Early Struggle
Premium|Government Bonds in India : सरकारी कर्जरोख्यांत गुंतवणूक कशी करावी सुरक्षिततेसोबत मिळवा नियमित उत्पन्न
Loading content, please wait...