alien
Esakal
रवि आमले
एकंदर १९४७-४८चे अवघे साल उडत्या तबकड्यांचे वर्ष ठरले. आकाशातील मृगजळ, उल्का, हवामान खात्याचे विशालकाय फुगे यांत लोकांना उडत्या तबकड्यांचे भास होत होते. अनेकजण बनावट कहाण्या सांगून स्वतःचे महत्त्व वाढवून घेत होते. सनसनाटी घटनांना सर्वाधिक वृत्तमूल्य असते. परिणामी फार शहानिशा न करता त्याच्या बातम्या पसरवल्या जात होत्या.
भिंगरीप्रमाणे भिरभिरणाऱ्या वृत्तचक्राने भल्याभल्यांचे मेंदू भेलकांडून जात आहेत. काल काय पाहिले, वाचले तेही नीट आठवत नाही म्हटल्यावर या वर्षाच्या आरंभीची ती इन्स्टा-गंमत कोणाच्या लक्षात असणार? २०२५चा तो पहिला आठवडा. तारीख ६ जानेवारी. त्यादिवशी लक्षावधी लोक मोबाईलवर नेहमीप्रमाणे रिळे गुंडाळत होते. अचानक काहींच्या डोळ्यांत तो चित्रफितीचा तुकडा घुसला. त्यात दिसत होते परग्रहावरील मानवांचे कोसळलेले यान. काही संशोधक त्याची तपासणी करीत आहेत, अनेकजण दूरवर उभे आहेत आणि मधे ती उडती तबकडी, असे ते दृश्य.
हल्ली बातम्याही विषाणूंप्रमाणे ‘व्हायरल’ होतात. ही बातमीही अशीच पसरली. त्यामुळे मग विविध दैनिकांच्या ई-पत्रिका, वृत्तवाहिन्या यांनी ती ‘आम्ही या व्हिडिओची पुष्टी करीत नाही’ असा शहाजोगपणा करीत उचलली. चर्चा सुरू झाली, की पृथ्वीवर एलियन आले. त्यांची उडती तबकडी ॲरिझोनामध्ये कोसळली. पण हे सारेच खोटे होते. ती चित्रफीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली होती. हे अर्थातच नंतर कोणीतरी केलेल्या तथ्यशोधनातून समोर आले. तोवर असंख्य लोकांनी ती उडती तबकडी पाहिली होती. त्यांच्यातील अनेकांपर्यंत ते फॅक्ट चेक जाण्याची शक्यता नव्हती. परिणाम? - त्यांच्या दृष्टीने परग्रहावर मानवसदृश प्राणी असतात आणि ते एलियन्स पृथ्वीपर्यटनास येतात.