इतिहासाचे म्हणून एक बल व गती असते हे मान्य केले, तरी ते आत्मसात करून आपल्या अंगावर घेऊन त्यानुसार विचार व कृती करण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये असेलच असे नाही. ते ज्यांच्यात असते त्याच व्यक्ती समूहाचे नेते होऊ शकतात व इतिहास घडवू शकतात. त्यांनाच विभूती, नायक, महानायक मानले जाते. अशा महान व्यक्ती प्रसंगी इतिहासाची दिशा व गतीही बदलू शकतात.
इतिहास लिहिताना नेमके कोणते एकक (Unit) केंद्रस्थानी ठेवून लिहायचा, म्हणजे भूतकालीन घटनांचे यथायोग्य आणि यथार्थ आकलन होऊ शकेल, हा इतिहासलेखनशास्त्रामधील (Historigraphy) कळीचा प्रश्न आहे. राष्ट्र हे असे एकक होऊ शकते, त्याचप्रमाणे देशाचे राजेमहाराजेसुद्धा एकक होऊ शकतात.
किंबहुना पूर्वीच्या काळी इतिहास याच पद्धतीने लिहिला जात असे. आता राजेरजवाडे किंवा लढवय्ये सेनापती या व्यक्ती असल्या, तरी सामान्य व्यक्ती नसून विशेष व्यक्ती असतात हे वेगळे सांगायची गरज नाही.