

UPI Digital Payments
esakal
मोबाईल फोन काढायचा, क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि काही सेकंदांत पैसे समोरच्या व्यक्तीच्या किंवा दुकानदाराच्या खात्यात जमा! गेल्या दशकात भारतातील आर्थिक व्यवहारांची ही सवय इतकी रूढ झाली आहे, की ‘यूपीआय’ हा शब्द आता केवळ डिजिटल पेमेंटची सुविधा राहिलेला नाही; तो भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, १५ ऑक्टोबर २०२६पासून दोन हजार रुपयांपेक्षा अधिकच्या काही व्यापारी यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लागू होणार असल्याने या व्यवस्थेच्या आर्थिक शाश्वततेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
यूपीआयची सुरुवात २०१६मध्ये झाली. अनेक बँका, पेमेंट ॲप्स आणि व्यापारी यांना एका परस्पर-सुसंगत प्रणालीत जोडणे हे त्याचे वैशिष्ट्य. २०२५-२६मध्ये यूपीआयवर तब्बल २४ हजार कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले आणि त्यांची एकूण किंमत सुमारे ३१४ लाख कोटी होती. या काळात यूपीआयचा व्यवहारांच्या संख्येतील वार्षिक वाढीचा दर ३० टक्के होता. भारतातील डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये यूपीआयचा वाटा सुमारे ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै २०२६मध्येच यूपीआयवर दररोज सरासरी ७६ कोटींच्या आसपास व्यवहार झाले. त्यासाठी ७४१ बँका यूपीआय नेटवर्कवर सक्रिय होत्या.