
महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीचं इंजिन आहे, ते येथील शहरीकरणामुळे. वस्तुतः गेल्या दोन दशकांपासून शहरांचा विकास होत नाहीये. त्यांना सूज येते आहे. शहर नियोजनाचे बुरसटलेले आराखडे, निष्क्रिय प्रशासनाने नाचवलेले कागदी घोडे आणि तात्पुरती मलमपट्टी करून महानगरांचा कारभार सुरू आहे. मुंबईतील नुकत्याच घडलेल्या लोकल अपघातात आठजणांनी जीव गमावला. ही दुर्घटना नसून शहराची व्यवस्थाच कोलमडल्याचे ठळक लक्षण आहे. मुंबापुरीची जशी ही दुरवस्था तशीच थोड्याफार फरकाने पुण्यनगरीचीही! टेक्नोसिटी म्हणून मिरविणाऱ्या हिंजवडीला पावसाच्या सरींत वाहून जावं लागतं.