भवताल वेध। गोपाळ कुलकर्णी
आर्थिक विकासाचे शहरकेंद्री प्रारूप अपरिहार्य असले, तरीसुद्धा निसर्गाच्या मदतीशिवाय ते तग धरू शकणार नाही. जागतिक बँकेचा ताजा अहवाल नेमके तेच अधोरेखित करतो. लहरी निसर्गापासून आपल्याला शहरांप्रमाणेच गावेदेखील वाचवायची आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान हे असे दुहेरी असेल.
उत्क्रांतीच्या वाटेवर मानवी मेंदूला लागलेले शोध आणि स्वअस्तित्वाचा बोध यांनी शहरांचा झगमगाट वाढविला. पुढे ही शहरे मानवी कर्तृत्वाची मानबिंदू बनली. धर्मकारण, अर्थकारण आणि राजकारणही बहरले या शहरांच्या मिठीमध्येच. शहरांनी सुबत्ता आणल्याने माणसाला कला, साहित्य आणि संस्कृतीमध्ये रमण्याची संधी मिळाली. त्यामुळे देश कोणताही असो, प्रत्येककाळी विद्वतजनांना नशीब काढण्यासाठी शहरांमध्येच धाव घ्यावी लागल्याचे दिसून येते.
शहर एकदा वसले की ते विस्तारत जाते, मग त्याच्या शेजारील अन्य प्रदेशही त्याचाच एक अविभाज्य घटक होऊन जातात. आपल्याकडे तर गावांनाही शहरासारखे स्मार्ट दिसावे असे वाटते. अर्थात असे वाटण्यात गैर काहीच नाही, पण आपल्याकडचा नागरी विकास पाश्चात्त्य देशांसारखा नाही; खरेतर तो कमालीचा अस्ताव्यस्त, आकारहीन अन् दिशाहीन आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
तसा तो नसता तर आज वाटीभर पावसात शहरे तुंबली नसती, उष्णतेच्या लाटांमुळे कामे बंद ठेवण्याची वेळ दिल्लीसारख्या महानगरांवर आली नसती. भविष्यात हे आव्हान किती बिकट होत जाणार आहे आणि त्यासाठी धोरणकर्त्यांनी नेमक्या कोणत्या उपाययोजना आखायला हव्यात, याचे चित्र जागतिक बँकेच्या ताज्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे.