color building
Esakal
प्राची गावस्कर
शहरी विकासामुळे नवे बांधकाम आणि घरांच्या नूतनीकरणामुळे रंगांची मागणी वाढते. सर्वांसाठी घरे आणि मेक इन इंडियासारखे सरकारी उपक्रम बांधकामांना चालना देतात, ज्यामुळे रंगांची मागणी
निर्माण होत आहे. तसेच मध्यमवर्गीय लोकांमध्ये दरडोई उत्पन्न वाढल्याने गृहनिर्माण आणि प्रीमियम सजावटीच्या रंगांवर खर्च वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात वाढीला चांगली संधी आहे.
समोरच्या घराचे रिनोव्हेशन सुरू होते, शेवटच्या टप्प्यात रंगकाम सुरू झाले आणि अगदी वेगळ्याच रंगांच्या वापरामुळे माझे लक्ष वेधले गेले. संपूर्ण घरात करड्या रंगाचा वापर केला होता. घर रंगवताना निळा, पिवळा, हलका गुलाबी, पिस्ता असे रंग बघण्याची वर्षानुवर्षांची सवय असताना, हे काहीतरी वेगळेच रंग वापरलेले बघून उत्सुकता ताणली गेली.
एकदा समोरच्या घराचे मालक आलेले असताना, त्यांना विचारलेच, ‘अरे, तुम्ही घराला असा करडा वगैरे रंग कसा काय दिला?’ त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘ताई, आता ट्रेंड बदललाय. पूर्वीसारखे ठरावीक रंग नाही वापरत आता कोणी. नवे हटके रंग वापरले जातात आणि ते दिसतातही छान. अहो माझ्या बायकोने तर, मेरावाला ग्रे असे म्हणून हीच शेड हवी म्हणून हट्ट धरला आणि सुदैवाने आम्हाला ती मिळालीदेखील.’ मनात म्हटले, अरे वा, आता आपल्यालाही मेरावाला पिंक किंवा मेरावाला वेगळाच काहीतरी, असा हट्ट करायला हरकत नाही. रंगाच्या या भल्यामोठ्या बाजारपेठेत मेरावाला रंग आता नक्की मिळेल. मग आपलंही घर रंगेल मेरावाला रंगामध्ये...