

US Venezuela Oil Deal
esakal
मधुबन पिंगळे
जगातील सर्वाधिक तेलसाठे असणाऱ्या व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रांसाठी अमेरिकेने करार केला आहे. तब्बल ६५ अब्ज बॅरेल तेलाच्या उत्खननाचा हा प्रस्तावित करार केवळ अमेरिकेची ऊर्जेची गरज भागविण्यापुरता मर्यादित नसून, जागतिक तेलपुरवठा आणि कच्च्या तेलाच्या दरांवरील प्रभाव वाढविण्याच्या अमेरिकेच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग मानला जात आहे. चीनकडे झुकलेल्या व्हेनेझुएलाला पुन्हा आपल्या प्रभावक्षेत्रात आणण्याच्या दृष्टीनेही या कराराचे महत्त्व आहे.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाबरोबर करार केल्याचे जाहीर केले. या करारानुसार, अमेरिकेला व्हेनेझुएलातील ६५ अब्ज बॅरल कच्चे तेल मिळणार आहे. अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या एकूण साठ्यापेक्षा या करारातून मिळणारे तेल जास्त असून, त्यातून जागतिक तेल उत्पादनाच्या समीकरणांवरील पकड मजबूत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाने छापा टाकत, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोला मडुरो यांना जानेवारीमध्ये बंदीवान केले होते. तेथून त्यांना अमेरिकेत आणण्यात आले आहे आणि व्हेनेझुएलामध्ये हंगामी सरकार सत्तेवर आहे. त्याच वेळी व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रावर अमेरिकेचे नियंत्रण असेल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्याप्रमाणे अमेरिकेने पहिले पाऊल टाकले आहे.