गौरी करंबेळकर
आसामच्या जुनमोनीनं मला काही महिन्यांपूर्वी आपल्या गोड्या मसाल्याची रेसिपी विचारली. तिच्या केळवणाला तिनं माझ्याकडे श्रीखंडाची फर्माईश केली! माझ्या आईला तिच्या वाढदिवसाला माझ्या हातची बंगाली पद्धतीची भाताची खीर हवी होती! आणि आता माझा उन्हाळा उडिया पद्धतीचा पखाळ भात खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही...
ए म.ए.पर्यंत घरात राहून, आईनं पहाटे उठून करून आयते हातात दिलेले दिवसभराचे तीन-चार डबे घेऊन गेलेल्या आणि गरज म्हणूनही बाहेरचं कधीही न खाल्लेल्या मला, एकदम उठून रोज बाहेरचं, तेही फाइन डाइन रेस्टॉरंटमध्ये वगैरे न जाता बंगाली मंथली मेसमध्ये जाऊन खायची वेळ आली, तेव्हा आमच्या बाबांच्या भाषेत सांगायचं, तर घरच्या अन्नाची खरी किंमत कळली! माझी जीभ किऽऽत्ती लाडावलेली आहे, हे मला पहिल्या चार दिवसांतच कळलं!
महाराष्ट्रीय आणि पूर्वेकडच्या राज्यांमध्ये बरेच फरकही आहेत. काही ठरावीक पदार्थ रिफाइंड तेलात करतात, पण बाकी बहुतांश पदार्थ सरसोच्या तेलात केले जातात. फोडणीसाठी पांचफोरन (मेथी-दाणा, सौंफ, जिरे, मोहरी आणि कलौंजी) वापरलं जातं. तेल आणि फोडणीचे जिन्नस यांमुळे चवीत, सुगंधात खूपच वेगळेपण जाणवत राहतं. सरसोच्या तेलाच्या विशिष्ट उग्र वासाची सवय नसेल तर ते सहन होत नाही, आवडत नाही. पण हळूहळू त्याच उग्र वासाची सवय होत जाते, ते आपण रेलिश करायला शिकतो. शेवटी शेवटी तर माझी मजल काही विशिष्ट गोष्टींवर कच्चं तेल घेऊन खाण्यापर्यंत गेली!