

Vararuchi Grammar
esakal
डॉ. नागनाथ बळते
वररुची (कात्यायन) हे भारतीय व्याकरण परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे विद्वान आहेत. त्यांनी रचलेल्या प्राकृतप्रकाश या ग्रंथामुळे प्राकृत भाषांच्या अभ्यासाला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झाले. विशेषतः महाराष्ट्री प्राकृतला त्यांनी दिलेले अग्रस्थान ही मराठी भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरली. प्राकृतप्रकाश हा केवळ प्राकृत भाषांचा व्याकरण ग्रंथ नसून संस्कृत-प्राकृत परस्परसंबंध स्पष्ट करणारा आधारभूत ग्रंथ आहे.
इसवी सन पूर्व सुमारे २५०च्या काळात वररुची यांनी प्राकृत भाषेचे प्राकृतप्रकाश हा प्रसिद्ध व्याकरण ग्रंथ लिहिला. या ग्रंथात महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी आणि पैशाची या चार प्रमुख प्राकृत भाषांचे वर्णन केले आहे. संस्कृत व्याकरणात पाणिनी यांना जे स्थान आहे, तेच प्राकृत व्याकरणात वररुची यांना दिले जाते. वररुची यांनी सर्व प्राकृत भाषांमध्ये महाराष्ट्री प्राकृताला सर्वाधिक महत्त्व दिले. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्मामुळे मागधी म्हणजेच पाली भाषेला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते, परंतु पुढे तिचे महत्त्व कमी होत गेले आणि महाराष्ट्री प्राकृतचा उत्कर्ष झाला. वररुची यांच्या काळात महाराष्ट्रीला अग्रस्थान प्राप्त झाले.
वररुची यांच्या प्राकृतप्रकाश या ग्रंथात महाराष्ट्री प्राकृत, पैशाची, मागधी आणि शौरसेनी या भाषांचा विचार केला आहे. वररुची यांनी महाराष्ट्री आणि शौरसेनी या प्राकृत भाषांना प्रमुख मानले असले, तरी महाराष्ट्रीला विशेष महत्त्व दिले आहे. इतर प्राकृत भाषांचे नियम सांगताना ते वारंवार ‘शेषं महाराष्ट्रीवत्’ असे म्हणतात. याचा अर्थ ‘उर्वरित नियम महाराष्ट्रीप्रमाणेच समजावेत’ असा होतो. या विधानावरून महाराष्ट्री प्राकृत भाषेला त्यांनी सर्वश्रेष्ठ प्राकृत भाषेचे स्थान दिले होते, हे स्पष्ट होते.