Humanity and Technology
Esakal
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आजवर मुख्यतः सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि मानवतावादी परिप्रेक्ष्यातून पाहिली गेली. परंतु, अाता २१व्या शतकाच्या डिजिटल युगात तिची खरी कसोटी लागते आहे. वेगवान इंटरनेट, झपाट्याने पसरणारा सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता प्रभाव, बिग डेटा आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानांमुळे जग अभूतपूर्व पद्धतीने एकत्र आले आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी जोडली जात आहे. या ‘जोडलेल्या जगात’ आपण केवळ देश, जात, धर्म, पंथ किंवा भाषा अशा चौकटीत राहू शकत नाही.
किंबहुना अशा मर्यादित चौकटीत राहूच नये. डिजिटल जगाने आपल्याला जवळ आणले असले, तरी नैतिकता, गोपनीयता, भेदभाव आणि डिजिटल विभाजन यांसारख्या गंभीर आव्हानांचाही सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या भावनेला डिजिटल काळाशी जोडणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी मानवी हक्क आणि त्याचा सन्मान ठेवणारी ‘डिजिटल माणुसकी’ हा दृष्टिकोन स्वीकारला, तरच डिजिटल क्रांती खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि कल्याणकारी ठरेल.