Vidya Balan Interview: मला इतरांना हसवायचं आहे..!

Indian Bollywood Actress Vidya balan : कहानी, शेरनी, डर्टी पिक्चर, शकुंतला देवी, तुम्हारी सुलु अशा नायिकाप्रधान चित्रपटांमध्ये बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारणाऱ्या विद्याच्या करिअरला वीस वर्षं पूर्ण झाली त्यानिमित्ताने..
vidya balan interview
vidya balan interviewEsakal
Updated on

पूजा सामंत

विद्या बालन ही बॉलिवूडमधली आघाडीची स्टार... सतत उत्साहानं सळसळणाऱ्या विद्याला बोलायला खूप आवडतं. कुठल्याही प्रश्नाचं थातुरमातूर उत्तर न देता ती प्रामाणिक उत्तरं देते.

कहानी, शेरनी, डर्टी पिक्चर, शकुंतला देवी, तुम्हारी सुलु अशा नायिकाप्रधान चित्रपटांमध्ये बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारणाऱ्या विद्याच्या करिअरला वीस वर्षं पूर्ण झाली आहेत.

तिचा भूल भुलैय्या ३ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. त्यानिमित्त तिच्याबरोबर मारलेल्या गप्पा...

Q

विद्या, तुझा बहुप्रतिक्षित भूल भुलैय्या ३ आणि मल्टी स्टारर सिंघम अगेन हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले... तुझ्यावर याचं काही दडपण आलं का?

A

विद्या बालन : मला इंडस्ट्रीत येऊन आता वीस वर्षं झालीयेत. एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणं हे काही आता नवीन नाहीये. सिंघम अगेन मल्टी स्टारर होता, पण तो भूल भुलैय्याबरोबर प्रदर्शित झाला नसता, तरी आणखी दुसरा एखादा चित्रपट त्याच वेळी प्रदर्शित झाला असता. शेवटी आपलं नाणं खणखणीत असावं लागतं. त्यामुळे मला काही दडपण आलं नव्हतं.

Q

भूल भुलैया ३ चित्रपटाला उत्तम यश लाभेल याची तुला खात्री होती? यश कसं सेलिब्रेट केलंस?

A

विद्या बालन : मेरी गट फिलिंग थी की मेरी यह फिल्म सफल होगी । ‘मंजुलिका’ या माझ्या व्यक्तिरेखेला पहिल्या भागात खूप पसंती मिळाली. मंजुलिकाचा खुमार इतका होता, की माझे अनेक चाहते मला गेली काही वर्षं मंजुलिका म्हणूनच ओळखतात. पण भूल भुलैय्या ३मध्येदेखील मला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, माझा ‘आमी जे तोमार’वरचा डान्स आवडीनं बघितला जाईल, या भूमिकेचं पुन्हा स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. याचं एक मुख्य कारण म्हणजे भूल भुलैय्या २मध्ये मी नव्हते. असो.

सध्या मात्र भूल भुलैय्याच्या यशाच्या सेलिब्रेशनसाठी मला वेळ मिळालेला नाही. फिल्म ऐन दिवाळीत रिलीज झाली. दिवाळीत मी घरी बिझी होते. मग टी-सीरिजनं मीडियाला आमंत्रित केलं.

भूल भुलैया ३च्या स्क्रिनिंगसाठी मी, माझा नवरा सिद्धार्थ (रॉय कपूर), माझे आई-वडील, मोठी बहीण प्रिया, तिचे पती, तिची जुळी मुलं असे सगळे गेईटी गॅलेक्सीमध्ये गेलो होतो. माझ्या कुटुंबानं फिल्म खूप एन्जॉय केली, याचा आनंद माझ्यासाठी मोलाचा होता. याचं एक मुख्य कारण म्हणजे जवळची माणसंच आपल्याला त्यांचं खरं मत सांगतात. त्यांना माझी खुशमस्करी करण्याची गरज नसतेच.

Q

भूल भुलैय्या सुपर हिट झाल्यावर तू भूल भुलैय्या २मध्ये का दिसली नाहीस?

A

विद्या बालन : माझं स्पष्ट मत होतं, की एखादा सिनेमा प्रेक्षकांना आवडला, तर त्याचं यश आणखी एनकॅश करत बसायचं नाही. शोले हा लोकप्रिय कल्ट सिनेमा ठरला. तर त्याच्यावर आधारित रामगढ़ के शोले हे विडंबन लोकांना अजिबात आवडलं नाही. ‘मास्टर पीस’ एखादाच होतो. पण कदाचित माझं मत हल्लीच्या काळात चुकीचं ठरेल.

हल्ली सिक्वेल काढणं फारच कॉमन आहे. मला भूल भुलैय्या २ची ऑफर आली, तेव्हा ती स्वीकारण्याची माझी मानसिक तयारी नव्हती. मी नकार दिला. पण माझं मत चुकीचं ठरलं. भूल भुलैय्या २देखील चांगलाच यशस्वी झाला. भूल भुलैय्या २च्या यशामुळे तिसऱ्या भागाची तयारी सुरू झाली. मला ऑफर आली आणि मी दिग्दर्शक अनिस बझमीला होकार दिला.

Q

माधुरी दीक्षित-नेनेबरोबर चित्रपट करण्याचा तुझा एकूण अनुभव कसा होता? माधुरीला भूल भुलैय्या ३मध्ये कास्ट करण्याची योजना आधीच केली गेली होती का?

A

विद्या बालन : नाही! माधुरी दीक्षित भूल-भुलैय्या ३मध्ये आधी नव्हती. तिला कास्ट करण्याचा विचार नंतर झाला. आणखी एखाद्या नामी अभिनेत्रीला घ्यावं हा विचार नंतर केला गेला. अनिसभाई यांनी सहजच माधुरीला ऑफर केली आणि माधुरीनंही ती सहज स्वीकारली. माधुरीचा होकार येईल असं कुणाला वाटलं नव्हतं.

ज्या क्षणी माधुरीनं हा चित्रपट स्वीकारला, तेव्हाच अंदाज होता आता, की आमच्या दोघींच्या जुगलबंदीचा डान्स ठेवला जाणार, आणि तसंच झालं! कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी ‘आमी जे तोमार’ डान्सची कोरिओग्राफी केली.

एकीकडे मी दो और दो प्यार चित्रपटाचं प्रमोशन करत होते आणि त्यानंतर ‘आमी जे तोमार’ची रिहर्सल. खूप थकून जात असे. माधुरीला पाहून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. ती माझी प्रेरणा होती. पण डान्स म्हटलं की माधुरी इज द अल्टिमेट! मी लहान असताना माधुरीचा तेजाब आला होता. त्यातलं तिचं ‘एक-दो-तीन...’ हे गाणं आणि डान्स विलक्षण लोकप्रिय ठरले. माझ्यावरही या डान्सचं गारुड होतं.

मी आरशात बघून त्या गाण्यावर डान्स करायचे. त्यामुळे आता माधुरीसोबत डान्स करायचं माझ्यावर दडपण आलं. मी डान्स शिकलेले नाहीये. ते कसब माझ्याकडे नाही; हे खरं. म्हणूनच मी माधुरीसोबत एका फ्रेममध्ये डान्स करताना तणावाखाली होते. आधीच्या चित्रपटात ‘आमी जे तोमार’ हे माझंच गाणं... त्यावरचा माझा डान्सही प्रसिद्ध आहे, त्या गाण्यामुळे माझं नाव झालं. त्यामुळे माधुरीसारख्या कसलेल्या नृत्यांगनेसोबत नाचून मला माझं हसू करून घ्यायचं नव्हतं. माधुरी ट्रेन्ड डान्सर आहे, मी नाही.

मी प्रचंड सराव केला. आमच्या दोघींचा सराव वेगवेगळा झाला. प्रत्यक्ष डान्सचं शूटिंग सुरू झालं आणि माधुरीनं अचानक स्टेप बदलली, मी खूप गडबडले. मला जमणार नाही असं मी सांगितलं. पण माधुरीचा मोठेपणा म्हणून तिनं स्वतः मला स्टेप्स करून दाखवल्या आणि मी सहजपणे ‘आमी जे तोमार’ करू शकले.

माधुरी माझी प्रेरणा होती, पण तिच्या सान्निध्यात आल्यावर मला जाणीव झाली, की ती अतिशय दयाळू आहे, उत्तम माणूस आहे! हॅट्स ऑफ टू हर! माधुरीसोबत होते, तरी मी उत्तम परफॉर्म करू शकले आणि प्रेक्षकांनाही माझा डान्स आवडला याचं समाधान आहे मला.

Q

माधुरी तुझ्यापेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री आहे. तिच्या अचानक येण्यानं फिल्ममधले तुझे सीन एडिट झाले का?

A

विद्या बालन : जसं मी म्हटलं, माधुरीला घेणं आधी विचाराधीन नव्हतं. आणखी एका फिमेल स्टारला घ्यावं असा फक्त विचार होता आणि सहज माधुरीला ऑफर केली गेली, तिनं होकार दिला आणि मग फिल्मबद्दल आकर्षण वाढावं म्हणून आमचा एकत्र डान्स चित्रपटामध्ये घेण्यात आला. असो, माधुरी फिल्ममध्ये असली तरी माझे सीन एडिट झाले नाहीत, जितके शूट झाले ते चित्रपटात आहेत.

Q

नव्या पिढीचा शिलेदार कार्तिक आर्यनसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?

A

विद्या बालन : खूप छान! कार्तिक मनमिळाऊ आहे. पहिल्याच भेटीत आमची गट्टी झाली. मी त्याची खूप टर उडवत असे. कोलकत्याच्या काली माता मंदिरात जाण्याचा माझा परिपाठ आहे. मी कार्तिकला विचारलं, तू येशील का कोलकत्याला? मी जाणार आहे. तो अगदी आनंदानं आला. खूप आनंदी माणूस आहे कार्तिक.

Q

तुला ओटीटी माध्यमासाठीही ऑफर येत असतील...

A

विद्या बालन : ओटीटी हे माध्यम लॉकडाउन काळात खरं लोकप्रिय झालं, कारण अवघं जग चार भिंतींत बंदिस्त होतं. घरगुती मनोरंजन हाच पर्याय ठरला. ओटीटीवर डार्क क्राइम, हॉरर कन्टेन्टचा भलताच सुकाळ सुरू झालाय, असं मला स्वतःला जाणवू लागलं.

भयानक शारीरिक शोषण, हत्या, बदला, रक्तरंजित कथा याखेरीज काही दिसत नाही ओटीटीवर. आपल्या अवतीभवती इतकं दुःखं, ताणतणाव, नात्यांमधली गुंतागुंत आहे; मग नवे ताण ओटीटीवरून का विकत घ्या? म्हणूनच मी ओटीटीपासून सध्या दूर आहे. मला प्रकर्षानं कॉमेडी रोल करायचा आहे... मला हसायचं आहे... इतरांना हसवायचं आहे!

Q

आजपर्यंत केलेल्या भूमिकांमध्ये कुठली भूमिका जवळची वाटते?

A

विद्या बालन : खरं सांगू? सिल्क! सिल्क स्मिताच्या कारकिर्दीवर आधारित डर्टी पिक्चरमधली ही भूमिका माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक आश्चर्यकारक बदल घडवण्यास कारणीभूत ठरली. या भूमिकेसाठी सेक्स अपील असणं आवश्यक होतं. माझ्याकडे ते नाही, असं मला वाटत होतं.

स्वतःच्या शरीराबद्दल संकोच वाटत असे. पण मोठं धाडस केलं आणि माझा संकोच दूर झाला, स्वतःबद्दलचं मत बदललं, ॲक्सेप्टन्स आला. मी स्वतःला बोल्ड ॲण्ड ब्यूटिफुल मानू लागले.

म्हणूनच सिल्क स्मिताच्या व्यक्तिरेखेनं एका वेगळ्या विद्याला जन्म दिला! मी फिअरलेस झाले. अभिनयाच्या व्यवसायात लाजरीबुजरी व्यक्ती टिकू शकणार नाही. सिल्कच्या व्यक्तिरेखेनं मला आत्मविश्वास दिला.. मैं भी परफेक्ट हूँ!

Q

विद्या, तुझ्या व्यक्तिमत्त्वात, शरीरयष्टीत कमालीचा बदल दिसून येतोय...

A

विद्या बालन : खरं सांगू? गेली अनेक वर्षं मी धष्टपुष्टच आहे. त्याची मला फार खंत वाटत नसे, पण वजनासोबत माझा पित्ताचा त्रास वाढू लागला. त्याचं निदान केलं तेव्हा त्यात काही हार्मोनल इशूजही होते. मी पूर्ण शाकाहारी आहे. जिममध्ये जाऊन नियमित व्यायाम आणि काटेकोर दिनचर्या पाळूनही माझं वजन नेहमी वाढतच होतं.

मला माझ्या वाढत्या वजनाचा इशू नव्हता, मी खूश होते स्वतःवर! पण अन्न जात नव्हतं आणि पित्ताचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यासाठी मला योग्य उपाय हवे होते. त्या काळात सिद्धार्थ चेन्नईच्या अमुरा ग्रुपसोबत काही प्रोग्रॅम करत होते. त्यांनी मला सुचवलं मी माझा हेल्थ इशू त्यांना सांगावा. मी त्यांच्याशी संपर्क साधला.

पालक, दुधीसारख्या कुणालाही सहज पचणाऱ्या, पौष्टिक भाज्या मला त्यांनी तात्पुरत्या बंद करण्यास सांगितल्या. काही वेगळा आहार सांगितला. त्यांची थेरपी सुरू झाली आणि माझा पित्ताचा त्रास थांबला. खाल्ल्यावर पोटात होणारी जळजळ थांबली.

शरीरात जे अतिरिक्त पाणी होतं, ज्यामुळे वजन वाढलं होतं, तेही नाहीसं झालं. वजन झपाट्यानं कमी झालं आणि मला हलकंफुलकं वाटू लागलं. या कायापालटानं एकूणच आत्मविश्वास वाढला. जे वजन कमी करणं मला पूर्वी कधी जमलं नाही, ते आता सहज शक्य झालं.

मी सगळ्या महिलांना सांगेन, तुम्ही जशा आहात तसा स्वतःचा स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या योग्य वेळी दूर केल्या पाहिजेत. त्या दूर झाल्या की आत्मविश्वास वाढतोच आणि तुम्ही सुंदर दिसता.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखादीला बदाम उपयुक्त आहेत, पण तुमच्या पोटाला ते अपायकारक असू शकतात हे ध्यानात घ्या. प्रत्येक स्त्रीनं प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. रोज योग्य आहार, पुरेशी झोप, किमान १५ मिनिटं व्यायाम केला पाहिजे. उत्तम आरोग्य हीच सौंदर्याची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घ्या!

(पूजा सामंत मुंबईस्‍थित मुक्त पत्रकार आहेत.)

-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com