

Warli Painting
esakal
दीपाली ठाकूर
माणसामाणसांतील वेगळेपण दिसून येत असतं, ते बऱ्याचदा त्यांच्या दिसण्यात, बोलण्यात, आचारांत, विचारांत, सवयींत, लकबींत. पुलंनी रंगवलेल्या व्यक्ती ‘वल्ली’ म्हणून अगदी सहज वाटल्या, त्या यामुळेच. आपल्या गुणावगुणांची पाळंमुळं जितकी आपल्या जन्मतः असलेल्या जनुकीय संरचनेत आहेत, तितकीच खोल ती जन्मानंतर होणाऱ्या आपल्या परिस्थितीजन्य जडणघडणीतही दडलेली आहेत.
एखादी शैली म्हणजे काहीतरी खासियत, वेगळेपण म्हणून आपण तिच्याकडे बघतो. वारली चित्रशैलीमध्ये एक विलक्षण ‘वेगळेपण’ मला जाणवलं, ते म्हणजे इथं सारी माणसं ‘एकसारखी’ असतात. डोक्याचा एक भरीव गोलाकार. धड म्हणजे एकमेकांना चिकटून असलेले दोन त्रिकोण; एक उलट, एक सरळ. बारीकशा रेषेनं हे धड डोक्याला जोडलेलं. वरच्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला जोडलेले एकच बिजागिरीचा सांधा असलेले, बोटं नसलेले हात आणि खालच्या त्रिकोणाला तसेच जोडलेले पाय... झाला माणूस पूर्ण. लहान-मोठी सारीच माणसं अशी एकाच साच्यातून चितारलेली. डोक्यावरच्या अंबाड्याच्या आणखी एका वर्तुळाकारामुळे कळून येणारा स्त्री-पुरुषभेद सोडला, तर इथं कुणीही गरीब-श्रीमंत नाही, सुंदर-कुरूप नाही. अमूर्त पातळीवर माणसा-माणसातलं वेगळेपण दाखवणाऱ्या आनंदी-दुःखी, प्रेमळ-क्रूर भावभावनांनाही इथं थारा नाही; कारण ते भाव व्यक्त करण्यासाठी त्यांना या चित्रांत चेहरामोहराच नाहीये.