

Stress-Free Wedding Planning Tips
esakal
काही कामं आपण ‘बघू, होतील नंतर...’ असं म्हणून पेंडिंग ठेवतो आणि शेवटी तीच अंगाशी येतात. जितक्या छोट्या छोट्या कामांचं आपण परफेक्ट प्लॅनिंग करू, तितकं आपण आणि घरचे रिलॅक्स होऊन लग्नात मजा करू शकतो. चला तर मग... लेट्स गेट प्लॅनिंग... घरून निघताना स्वतःला एकदा नक्की विचारा, ‘सगळं घेतलं ना व्यवस्थित?’
लग्न ठरवण्याइतकंच, किंबहुना त्याहूनही अंमळ अवघड काम असतं ते म्हणजे लग्नाची तयारी करणं. दोनेक दिवसांच्या कार्यक्रमांसाठी किमान दोन-चार महिने तरी तयारी करावीच लागते. ही तयारी करताना मदतीचे हात, प्रेमाचा सल्ला देणाऱ्या, ‘सगळं घेतलं का व्यवस्थित?’ असं विचारणाऱ्या व्यक्ती नसतील, तर ही सगळी प्रक्रिया खूप दमवणारी ठरू शकते. खरंतर लग्न हे वधू-वरानं सगळ्यात जास्त मौज करण्याचं कार्य असतं. पण अनेकदा या दोन उत्सवमूर्तीच कामाच्या गराड्यात अडकलेल्या असतात आणि त्यांच्या घरचे त्यांच्याभोवती क्लूलेस भिरभिरत असतात. त्यामुळे धड कोणालाच लग्न व्यवस्थित एन्जॉय करत नाही. पण सगळं व्यवस्थित प्लॅन केलं तर ही परिस्थिती टाळता येऊ शकते. हं, पण प्लॅनिंग अतिशयच चपखल हवं. प्लॅन बी, प्लॅन सीसुद्धा तयार हवेत. तुम्हाला लग्नाच्या दिवशी वैताग येऊ नये आणि लग्नाच्या आधी तयारीचं ओझंही वाटू नये यासाठी तुमच्या या मैत्रिणीचे काही प्रेमाचे सल्ले...