
मृणालिनी चितळे, पुणे
हिमालयाच्या गूढगर्भी विसावलेले मॅलरी आणि आयर्विन यांनी शंभर वर्षांपूर्वी जगातलं अत्युच्च शिखर सर केलं होतं की नाही या प्रश्नापेक्षा त्यांनी दाखवलेली धडाडी आणि अपराजित वृत्ती महत्त्वाची आहे. कालातीत आहे. त्याबद्दल कधीच कुणी शंका घेऊ शकत नाही हे निश्चित.
८ जून १९२४. पहाटे चार वाजता मॅलरी आणि आयर्विन उठले. २७ हजार फुटांवरच्या जेमतेम दोन माणसं झोपू शकतील अशा कॅम्प ६वरच्या तंबूमध्ये त्यांचा मुक्काम होता. रात्रभर झोप अशी लागलीच नव्हती. घाईघाईनं दोघांनी नाश्ता उरकला. मॅलरीनं आवश्यक त्या वस्तू बरोबर आहेत ना याची खात्री करून घेतली; मुख्य म्हणजे त्याची पत्नी रुथचा फोटो! तो त्याला एव्हरेस्ट शिखरावर ठेवायचा होता. रांगत रांगत दोघे तंबूबाहेर आले. आकाश निरभ्र होतं. आत्तापर्यंत हिमालयाच्या परिसरात निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव त्यांनी कैकदा घेतला होता.
आज निसर्गानं साथ दिली तर एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं त्यांचं स्वप्न साकार होणार होतं. त्यासाठी फक्त दोन हजार फुटांची वाटचाल करायची होती. त्या ‘फक्त’मध्ये अनंत अडचणींचे डोंगर आणि दऱ्या पार करायला लागणार याची त्यांना कल्पना होती. दोघांनी पाठीवर ऑक्सिजनचे अवजड सिलेंडर बांधले आणि चालायला सुरुवात केली. अक्राळविक्राळ बर्फाचे कडे आणि आ वासून पसरलेल्या दऱ्या त्यांच्या नजरेला आता सरावाच्या झाल्या होत्या.