
मुलांचे पान : कविता मेहेंदळे
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा बाणेदार प्रश्न जुलमी सत्तेला धडाडीने विचारणाऱ्या लोकमान्य टिळकांची कणखर मराठी; ‘ने मजसी ने परत मातृभूमीला- सागरा प्राण तळमळला’ अशी आर्त साद घालणारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची दिव्य मराठी; बहिणाबाईंची माणुसकीला साद घालणारी रसाळ मराठी... यापेक्षा मराठीचा आणखी वेगळा गौरव वेगळा काय असू शकतो?
‘‘लक्ष द्या मुलांनो, उद्या दुपारी तुमचा डबा खाऊन झाल्यावर तुमच्या तीनही तुकड्या तीन ते पाच या वेळात सभागृहात जातील. आधी आपापल्या वर्गात जमून नंतर रांगेनं तिथं जायचंय. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्तानं साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या भगिनी म्हणजे सभासद ‘बाल आनंद यात्रा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. लक्ष देऊन त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिलीत, तर आपल्या शाळेला पहिलं बक्षीस मिळेल. सातवीतली मुलं आहात तुम्ही! थोडी तयारी करून या.” विमलताई सूचना देत होत्या.
श्लोकनं हात वर केला. ताईंनी खूण करताच उठून त्यानं विचारलं, ‘‘‘बाल आनंद यात्रा’ म्हणजे काय?”
‘‘ते उद्याच कळेल. तुम्हा मुलांशी गप्पा, थोडी माहिती, थोडं मनोरंजन असं काहीसं असणार.” ताई म्हणाल्या.
‘‘कळलं. प्रश्नोत्तरं आणि मज्जा!” अवनी उत्स्फूर्तपणे म्हणाली.
‘‘नक्कीच! पण मराठी भाषेविषयी अधिक माहिती मिळवा. सामान्य ज्ञानातही भर पडेल त्यातून.” ताईंनी सांगितलं. आता श्लोक मधे घुसला, ‘‘म्हणजे जनरल नॉलेज ना?” ताई ‘हो’ म्हणेपर्यंत घंटा वाजली आणि दप्तरं पाठीला बिलगलीसुद्धा!
दुसऱ्या दिवशी ललित आणि शुभांगीनं स्वागत रांगोळी काढली. सभागृहातल्या फळ्यावर विहंगनं कार्यक्रमाचं नाव लिहिलं. शारदेच्या मूर्तीला घालण्यासाठी कुंदाच्या फुलांचा हार ताईंनीच करून आणला होता. मधली सुट्टी झाली. प्राजू व अवनी पळत पळत विमलताईंच्या वर्गाबाहेर येऊन थांबल्या. ताई बाहेर पडत असताना प्राजूनं ताईंना जवळ जवळ अडवलंच. ‘‘ताई, मराठीतल्या बोलीभाषा बावन्न ना? ही अवनी मघापासून बावन्न खोडून चौपन्न करत्येय. माझे आबा चुकतील कसे?”
‘‘हो. हो. तुझी डेक्कन क्वीन थांबव. आबा बरोबर आहेत. बोलीही लक्षात ठेवा.” ‘‘त्यात काय? कोकणी... वऱ्हाडी... हेलकाढी...” प्राजू बोटं मोडीत सांगू लागली.
‘‘हेलकाढी भाषा नाही. ती बोलण्याची ‘ढब’ असते. ढब म्हणजे पद्धत! बोली भाषा म्हणजे अहिराणी... कोल्हापुरी इत्यादी.” ताईंनी प्राजूच्या डोक्यावर टपली मारली, आणि पुढे म्हणाल्या, ‘‘तुमची मातृभाषा मराठी आहे खरं! घरी मराठी, पण बाहेर मोडकं तोडकं हिंदी, इंग्रजी बोलता! नकली अनुकरण तुमच्या विचारांवर राज्य करतंय.”
‘‘हं! ताई, त्या जर्मनीहून आलेल्या पाहुण्या बाईंचं नाव काय आहे?”
‘‘एमेलिया! गड-किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी त्या बाई भारतात आल्या आहेत. या ‘बाल आनंद यात्रे’मध्ये त्यांनाही रस आहे. येतीलच त्या इतक्यात. चला मुलींनो, मलाही डबा खायचाय. तुम्हीही खा...” म्हणत ताई शिक्षकांच्या खोलीत शिरल्या.
बरोबर तीन वाजता साहित्यप्रेमी मंडळाच्या सदस्या सभागृहात हजर झाल्या. सोबत वर्गशिक्षक होते आणि जर्मन पाहुणीही होती. स्वागतगीत झाल्यावर मंडळाच्या अश्विनीताईंनी सा.प्रे.विषयी थोडक्यात माहिती दिली. नंतर मोहनाताईंनी सुरुवात केली, ‘‘फेब्रुवारी महिना म्हणजे उन्हाळ्याची चाहूल. उन्हाळ्यात शाळेला सुट्टी. प्रवासाचे बेत, गावाला जाण्याचे वेध. आमरसावर ‘आडवा हात’ मारण्याचे दिवस. आइस्क्रीमची लज्जत वाढविणारा कालावधी. गरमी वाढते. ऊन तापते. सारखी तहान लागते. सगळं गारेगाऽर असावं वाटतं. म्हणून तर मी ‘गारेगाऽऽर’ कविता म्हणणार आहे. माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचीय.’’ मुलांच्या माना डोलल्या.
एक ‘साद’ कोकिळेची
पहाट झुळूक गारव्याची
आणि काय हवे उन्हाळी?
एवढी हाक पुरे प्रीतीची
एक गंध मोगऱ्याचा
प्रतिसादसा वाऱ्याचा
आणि काय हवे उन्हाळी?
झुला झुलतो रातराणीचा
एक ‘आरोळी’ ऊस रसाची
चव ती न्यारी गोड पन्ह्याची
आणिक काय हवे उन्हाळी?
भुरळ काळ्या करवंदांची...
एक झुला गुलमोहोराचा
एक नाचरा बहाव्याचा
आणि काय हवे उन्हाळी?
गालगुच्चा पळसाचा...
एक तिरीप भाजण्याची
एक आग ओकण्याची
आणि काही नको उन्हाळी
तल्लफ गारेगार जलाची
एक आस भटकंतीची
पाण्यात सूर मारण्याची
आणि काही नको उन्हाळी
हिमझड येवो वळवाची
ओऽऽ गारेगार, गारेगार
टाळ्या वाजवून मुलांनी हे गीत गायलं. छान लय सापडली होती सगळ्यांना.
उमाताईंनी ‘टॉमेटो आणि ढोल्या’ गोष्ट सांगितली. टोमॅटोच्या लाललाल राशीत बुडालेल्या आणि पाय घसरून पडणाऱ्या ढोल्याची फजिती सर्वांना आवडली. ढोलू ‘ढ’ होता आणि काय? वर्ग किनाऱ्याच्या लहरींसारखा फेसाळत होता. खिदळत होता. शाळेतल्या ताया मुलांना स्वस्थ बसविण्याचा प्रयत्न करत होत्या.
आता प्रश्नोत्तरं आणि मराठी गौरव दिनाची माहिती द्यायला अश्विनीताई उभ्या राहिल्या. ‘‘तुम्ही सगळी हुशार मुलं दिसताय. सांगा बरं, मराठी भाषेतला पहिला ग्रंथ कोणता?”
‘‘ज्ञानेश्वरी! त्यात काय?” समोरून उत्तर आलं.
अश्विनीताईंनी सांगितलं, ‘‘हात वर करा आणि एकेकानं उभं राहून उत्तरं द्या. उत्तरांना, म्हणजे योग्य उत्तरांना मार्क आहेत.’’ मग वंदनाताईंनी सुचवलं- ‘‘अगदीऽ पहिला ग्रंथ विचारलाय. ज्ञानेश्वरीच्या आधीचा!”
‘‘आठवलं ताई! ‘माही भटाचा’ आजीनं सांगितलंय मला.’’
‘‘‘माही’ नव्हे म्हाईंभट. ‘माही’ म्हणजे तुमचा महेंद्र धोनी ना? तर लीळाचरित्र ही चक्रधरस्वामींची माहिती म्हाईंभटांनी लिहिलीय- ती ग्रंथरूपात आहे. लक्षात ठेवा आता.” वंदनाताईंनी बजावलं.
‘‘जगभरातल्या भाषांमध्ये मराठी बोलीचा कितवा नंबर लागतो?’’
अवनीनं पटकन हात वर करून ‘‘अकरावा!” सांगितलं. ‘‘बरोब्बर! आता लोकसाहित्याचे प्रकार सांगा. म्हणजे... अभंग, लावणी इ.” ताईंनी पुढचा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचं उत्तर श्लोकनं दिलं. ‘‘भारूड, पोवाडे, ओव्या... हे सर्व प्रकार लोकसाहित्यात मोडतात.”
‘‘मोडतात? म्हणजे?” एमेलियाने हातांनी तुकडा मोडल्याची खूण केली. जर्मन पाहुणीची शंका लक्षात घेऊन अश्विनीताईंनी खुलासा केला की ‘मोडतात’ म्हणजे समाविष्ट होतात. ‘गणले’ जातात. वाकणे, मोडणे असा अर्थ इथे नसतो. मराठी भाषा ‘लवचीक’ आहे. काहीतरी कळल्यासारखी एमेलियाची मान हलली.
या वेळपर्यंत शाळेच्या मुख्याध्यापिका सभागृहात आल्या. कार्यक्रम सुरू होता. थोडा वेळ थांबून त्या लगेचच निघाल्या. उमाताईंनी त्यांना थांबवून शाळेच्या वाचनालयासाठी काही पुस्तके मंडळाकडून भेट म्हणून साधनाताईंच्या हाती दिली. फोटो क्लिक झाल्यावर साधनाताईंनी रजा घेतली.
पुढचा प्रश्न होता, ‘‘ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आहेत?”
‘‘सातशे. आणि त्या ओव्या म्हणजे अतिशय रसाळ, गोड असं अर्थज्ञान आहे. म्हणजे मूळ भगवद्गीतेतील संस्कृत श्लोक स्पष्ट करून सांगितलेत. होय ना ताई?” शुभांगीने झटक्यात उत्तर दिलं. म्हणाली, ‘‘माझी आई सध्या ज्ञानेश्वरी वाचतेय.”
‘‘ज्ञानदेवांनी मराठीला, ‘अमृतातें पैजे जिंके... म्हटलंय. म्हणजे भाषा इतकी मधुर आहे.” विमलताईंनी पुस्ती जोडली.
पुन्हा निवेदनाची सूत्रे हाती घेत अश्विनीताईंनी सांगितलं, ‘‘मराठी भाषेला मान्यता, शासकीय ओळख आहे किंवा नाही, हा प्रश्न मी गौण मानते. कारण तुम्हाला पटतंय का पाहा. सूर्याला तेजाचा, पाण्याला उसळण्याचा अन् पवनाला वाहण्याचा दाखला का द्यावा लागतो? ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा बाणेदार प्रश्न जुलमी सत्तेला धडाडीने विचारणाऱ्या लोकमान्य टिळकांची कणखर मराठी; ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला अशी आर्त साद घालणारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची दिव्य मराठी; बहिणाबाईंची माणुसकीला साद घालणारी रसाळ मराठी... यापेक्षा मराठीचा आणखी वेगळा गौरव वेगळा काय असू शकतो? मुळाक्षरांतील स्पष्ट धारेपासून मंत्रोच्चारातील गूढ अर्थापर्यंत, श्री गणेशामधील उपास्य भावनेपासून जाणतो मराठी-मानतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या सुरेश भटांच्या अभिमानाच्या ओलाव्यापर्यंत प्रत्येक भावनेला न्हाऊमाखू घालणारी आपली ‘माय मराठी’ आहे. पाहा, खरंय ना हे माझं बोलणं?”
‘‘होऽ होऽ होऽऽ!” उंचावून जल्लोष करीत मुलांनी संमती दिली.
‘‘आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारते- २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ कोणी आणि का ठरविला? हात वर करा.”
संदीपने हात नाचवला. उभा राहता राहता उत्तरला, ‘‘श्रेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून शासनाने हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ निश्चित केलाय.”
‘‘अरे व्वा! संदीप, शाळेला खूप गूण मिळवून दिलेस की!” उमाताईंनी खुशी व्यक्त केली.
‘‘‘गौरव दिन’चा ट्रान्सलेशन ‘फायर टाग’ होते... असते का?” एमेलियाने मराठीत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. ‘‘कलेल असा मराठी शिकाया आवडतो, नाहीऽऽ नाहीऽऽ आवडणार!” अशीही पुस्ती तिनं जोडली. गालातलं हसू ओठांनी दाबून मुलं कुतूहलानं या जर्मन पाहुणीकडे पाहायला लागली. तोपर्यंत पाच वाजले. टोल पडला होता.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.