डॉ. बाळ फोंडके
हत्तींच्या पाच प्रजातींमधल्या जनुकीय वारशाची जपणूक करण्यासाठी जे संवर्धनाचे प्रयत्न करणं अत्यावश्यक झालं आहे, ते संवर्धनदेखील भौगोलिक परिस्थितीची जाण ठेवून करायला हवं. एकच प्रणाली सगळीकडे कामी येईल, ही अपेक्षा व्यर्थ आहे. त्यासाठी एपिजेनेटिक्स या शाखेची मदत घेऊनच संभाव्य प्रकल्पांचे आराखडे तयार करायला हवेत.
हत्ती या प्राण्याचं आकर्षण सर्वांनाच असतं. पण त्यांच्या दोन प्रमुख प्रजाती असल्याची माहिती मात्र अनेकांना नसते. भारतातील हत्ती हे आफ्रिकेतील हत्तींपेक्षा निराळे असतात. त्यांच्या एकंदरीत आकारमानात आणि वजनात फरक दिसतो.
आफ्रिकन हत्ती अधिक अगडबंब असतात. उंचीनं तर मोठे असतातच, पण वजनानंही भारदस्त असतात. त्यांचे कान धान्य पाखडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुपासारखे भलेमोठे असतात. भारतीय हत्ती आपल्याला महाकाय वाटले तरी आफ्रिकी हत्तींच्या तुलनेत ते अंमळ लहानच असतात. त्यांचे कान सुपासारखे दिसले तरी सुपलीसारखे लहान असतात.