भावेश ब्राह्मणकर
जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला भारत आता पहिल्या तीनमध्ये येण्याची स्वप्ने पाहत आहे. गेल्या दीड दशकांत भारतातील विकासचक्रे गतिमान झाली आहेत. आता सागरमाला योजना आणि वाढवण बंदर विकसित करण्याचे उद्दिष्ट समोर आहे.
हे दोन्ही प्रकल्प म्हणजे विकासाचे सुदर्शनचक्रच म्हणायला हवे. कारण सुदर्शनचक्र कुठल्याही बाजूला भिरभिरताना अचूक लक्ष्य वेधते. अगदी तशाच पद्धतीने हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या असंख्य क्षेत्रे, तसेच व्यवसायांवर परिणाम करणार आहेत. यातून रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणे अपेक्षित आहे.
भारताला तिन्ही बाजूने सागरी किनारा लाभला आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर. जलमार्गाने होणारी मालवाहतूक तुलनेने अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही आहे.
सध्या भारतातील किमतींच्या दृष्टीने ९५ टक्के व संख्यामानानुसार ७० टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. तरीही आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा यांच्या अभावामुळे सागरी मालवाहतुकीबाबत भारत इतर आशियाई देशांच्या तुलनेत मागेच आहे.
जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला सागरी मालवाहतुकीच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच ‘सागरमाला’ प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे.