राजू नायक
पुढच्या काही वर्षांत तापमानवाढ आणखी धोकादायक होणार असून त्यादृष्टीने शाळेच्या इमारतींमध्ये आवश्यक बदल करून घेणे भाग आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी वर्गात हवा खेळती राहील, भरपूर खिडक्या असतील व वातावरण मोकळे राहील याची खबरदारी घ्यायला हवी. यासाठी शाळांभोवती हरित पट्टे करता येतील.
मला आठवतेय, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत रणरणत्या उन्हात खेळायचो. तो संपूर्ण महिना आम्ही मैदानावर असायचो. टीव्ही नव्हता, इंटरनेटची तर गोष्टच माहीत नव्हती. त्यामुळे रणरणत्या उन्हात क्रिकेटचे सामने जोरात असायचे. माझ्यासोबत माझ्या वयाची इतरही सारी मुले मैदानात बागडत असायची. परंतु आज तशी परिस्थिती राहिली आहे काय?
तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी म्हणजेच खेळ, सामने आणि मोकळ्या वातावरणात बागडणे, नातेवाइकांच्या घरी जाणे, तिथेही उन्हातान्हात खेळणे हे प्रकार आमच्या अंगवळणीच पडले होते. आजची मुले घरकोंबडी झाली आहेत. पालकांनाही त्यांना कुठे पाठवायला नको असते. मुलांची उन्हातान्हात जायची सवय मोडली आहे. अभ्यासानेही त्यांना जखडून ठेवले आहे. त्यामुळे खेळाला फारसे महत्त्व राहिलेले नाही. पण आता पूर्वीसारखे उन्हात खेळता येत नाही यामागे उष्णतेची वाढती पातळी हेदेखील कारण आहे.