उषा लोकरे
बाहेरून नारळासारखं दिसणारं, पण आकारानं लहान... सोलल्यावर एखाद्या बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र गोळ्यासारखं दिसणारं फळ म्हणजे ताडगोळा. बर्फासारखं दिसतं म्हणून याचं इंग्रजी नाव आइस ॲपल. फक्त उन्हाळ्यातच खायला मिळणारं हे फळ. ताड ही भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात आढळणारी अत्यंत उपयुक्त वनस्पती. उन्हाळ्यात रस्त्यावर रस्त्यावर मिळणारी नीरा याच झाडापासून करतात. नीरा म्हणजे उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठीचं अगदी योग्य पेय!
ही वनस्पती आपल्याकडे आफ्रिका खंडातून आली आणि मूळची इथलीच वाटावी इतकी इथं रुजली. आपल्याकडच्या कोकणाबरोबरच दक्षिण भारतातही ताडाची खूप लागवड होते. ताडाची झाडं खूप उंच वाढतात आणि पानं पंख्यासारखी नि मोठी असतात. या झाडांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. नर झाडाला अगदी लहान फुलं येतात, तर मादी झाडाची फुलं मोठी असतात. त्यांचं परागीभवन होऊन सहा ते दहा इंच रुंदीची, काळपट वांगी रंगाची दळदार फळं तयार होतात. त्यातल्या असलेल्या तीन बिया म्हणजेच ताडगोळे किंवा आइस ॲपल. ही फळं साधारण एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत मिळतात.