Salt Mine
Esakal
उज्ज्वला बर्वे
मीठ कुठून येतं असा विचार करायला लागल्यावर डोळ्यांसमोर अर्थातच समुद्राकाठची मिठागरं येतात. कुठे कुठे डोंगरातही मीठ सापडतं असं ऐकून होते, पण जमिनीखालीदेखील मिठाच्या खाणी असतात आणि अशा मिठाची खाण आपल्याला पाहायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. यंदा अचानक तो योग आला.
पोलंड बघायला जायचं ठरवलं आणि तिथे काय काय पाहता येईल याचा आम्ही शोध घ्यायला लागलो तेव्हा पहिल्यांदा मिठाच्या खाणीचा शोध आम्हाला लागला. (पोलिश लोकांना तो सातशे वर्षांपूर्वीच लागला होता.) क्राकोव शहरापासून जवळच या विलिच्का नावाच्या मिठाच्या खाणी आहेत आणि त्या पाहण्याची फार सुंदर सोय करण्यात आली आहे, असं अनेक ठिकाणी वाचायला मिळाल्यामुळे त्या खाणींना भेट द्यायची हे नक्की झालं.
क्राकोव शहरातून सिटी बसमधून खाणींच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. स्वच्छ ऊन होतं, हलकासा गारवा होता. पोलंड आणि युरोपमध्ये सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे ते दिवस होते त्यामुळे कुटुंबं, मित्रमैत्रिणींचे गट, आणि आमच्यासारखे एकटेदुकटे यांची भरपूर गर्दी जमली होती. पण सगळं व्यवस्थित, दिलेल्या वेळेनुसार चाललं होतं. कुठेही गडबड नाही की गोंधळ नाही.
इथे विविध देशांमधून पर्यटक येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी विविध भाषांमधले गाइड उपलब्ध आहेत. त्या भाषांमध्ये पोलिश, इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, इटालियन अशा अनेक भाषांचा समावेश आहे. आम्हाला मिळालेली गाइड तिथली स्थानिक होती. त्यामुळे तिचं पोलिश वळणाचं इंग्रजी ऐकायला छान वाटत होतं. आमचा वीसजणांचा ग्रुप एकत्र झाल्यावर आम्ही सगळे खाणीच्या दिशेने चालायला, खरंतर उतरायला लागलो.