Madhya Pradesh forest tourism itinerary Tadoba Pench Satpura
Esakal
भ्रमंती । डॉ. राधिका टिपरे
नजर लागेल अशी निकोप वाढ झालेले ते दोन छावे काही फुटांच्या अंतरावर पहुडलेले होते; जणू मग्न तळ्याकाठी, शांत नीरव वातावरणात फोटो सेशनसाठी त्यांनी आम्हा पामरांना वेळ दिला होता. घेता घेशील किती? दोन्ही करांनी? असंच काहीसं झालं.
दरवर्षीप्रमाणं यावेळी उन्हाळ्याच्या तोंडावर ताडोबा, पेंच ही जंगलं खुणावत होतीच. म्हणून दोन महिने आधीच सगळं आरक्षण करून टाकलं होतं. कारण हल्ली सगळीकडे जंगल सफारी फुल झालेल्या असतात. काही म्हणा, वाघाच्या प्रेमात पडून निसर्गप्रेमी आपल्या पोराबाळांसकट जंगल पर्यटनाचा आनंद घेतात, ही गोष्ट खरोखर अत्यंत सुखावह आहे. निसर्गात रमण्याइतकं सुख इतर कशातच नाही. मग ते जंगल असो नाहीतर डोंगर कपाऱ्या, हिमालयाच्या दऱ्याखोऱ्या असोत, नाहीतर समुद्रकिनारा.
आपण आपल्या मुलांना निसर्गाची ओळख करून द्यायलाच हवी, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी स्वतः भटकी आणि निसर्गवेडी आहे. त्यामुळे यावेळी मी ताडोबाच्या जोडीला मध्य प्रदेशमधील जंगलांना भेट द्यायचं आधीपासूनच ठरवलं होतं. महाराष्ट्रातील पेंचप्रमाणेच मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या पेंचच्या जंगलातील तुरिया, तेलिया या जंगलामध्येही मनसोक्त भटकंती झाली. हे जंगल पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे सातपुडा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी जायचं निश्चित केलं होतं. सातपुड्याच्या रांगांमध्ये पसरलेल्या या जंगलात जाण्यासाठी पचमढी, चुरू आणि मधाई या तीन ठिकाणांहून आपल्याला प्रवेश करता येतो. यापैकी मधाईचं प्रवेशद्वार सोयीचं असल्यामुळे आम्ही त्याची निवड केली.