
नीलेश करंदीकर
निळ्याशार सागराचं स्फटिकासारखं पाणी, केळीच्या बागा, नारळाची हिरवीकंच कुळागरं अशा वैशिष्ट्यांसह जागतिक पर्यटनाच्या नकाशावर चकाकणारं गोवा पर्यटकांसाठी स्वर्गवत ठिकाण असलं, तरी बारमाही नवागतांच्या भाऊगर्दीतही काही निरागस चेहरे गुदमरत असतात, नरकयातना अनुभवत असतात. फसवून, नोकरीचं आमिष दाखवून मनाविरुद्ध वेश्याव्यवसायात ढकललेल्या तरुणींची, लहान मुलींची व्यथा शहराच्या बाकीच्या चमचमाटात सहसा कुणाला दिसत नाही. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी झटणारे काही चेहरे गोव्याची खरी शान आहेत. त्यातलाच एक चेहरा म्हणजे जुलियाना लोहार.