महाराष्ट्रातल्या आणि त्याच्याही काही महिने आधी मध्य प्रदेशातल्या लाडक्या बहिणींनी सत्तेतल्या भाऊरायांच्या पारड्यात ओंजळी भरून मतांचे दान टाकून त्यांना तारल्याच्या आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या योजनांच्या प्रस्तुती-अप्रस्तुतीच्या चर्चा झडत असण्याच्या काळातच प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्या कितीजणांच्या डोळ्यांखालून गेल्या ते कळायला मार्ग नाही.
त्यातली एक बातमी आहे, संयुक्त राष्ट्रांच्या दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांची. यूएन वुमेन आणि यूएन ऑफिस ऑफ ड्रग्ज ॲण्ड क्राइम या दोन संस्थांनी ह्या सर्वेक्षणांचे अहवाल नुकतेच प्रसिद्ध केले. या अहवालावर विश्वास ठेवायचा तर त्यातले निष्कर्ष ‘धक्कादायक’ या शब्दातून व्यक्त होणाऱ्या भावनेच्याही पलीकडे जाणारे आहेत.