esakal | माणसाच्या नरडीचा घोट घेणारा 'देवमाणूस'!
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Pol story}

माणसाच्या नरडीचा घोट घेणारा 'देवमाणूस'!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

ज्याप्रमाणे सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे डॉक्‍टरही आपल्या आरोग्याचे रक्षण करत असतात. म्हणून आपल्या समाजात डॉक्‍टरांकडे आदराने पाहिले जाते. असे म्हटले जाते, की देव आणि डॉक्‍टर हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, काही डॉक्‍टर याला अपवाद आहेत. डॉक्‍टर लोकांची सेवा करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना मृत्यूपासून वाचवतात. मात्र, असे काही डॉक्‍टर आहेत, ते स्वत: लोकांसाठी मृत्यू बनलेत. "तो' डॉक्‍टर स्त्रियांना जिवंत दफन करायचा, परंतु ही खबर कोणालाच ठावूक नव्हती. हा मृत्यूचा खेळ नित्याचाच चालू होता... तो एक-एक करत प्रत्येकाच्या नरडीचा घोट घेत होता. मात्र, या कुकर्माचा कोणालाच थांगपत्ता लागला नाही.

सातारचा एक डॉक्‍टर आणि सहा खून... प्रत्येक खुनाचं साक्षीदार असणारं एक नारळाचं झाड. 2016 साली घटना उघडकीस आली आणि माणसं आपल्या शेजारच्याला पण भ्यायला लागली. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, काहीच कळना झालं. सध्या एका दुरचित्रवाणीच्या वाहिनीवर याच कथानकाच्या धर्तीवर "देवमाणूस' ही सिरियल चालू आहे. यापूर्वी क्राईम पेट्रोलमध्ये देखील ही घटना दाखवण्यात आली होती. या सिरियल किलर डॉक्‍टरचं नाव आहे "संतोष पोळ'. त्याच्यावर पाच महिला आणि एका पुरुषासह सहा खुनांचा आरोप आहे. तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोम नावाच्या ठिकाणी राहात असत आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता. 2016 मध्ये त्याला मुंबईच्या दादर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले, जे ऐकून पोलिस सुद्धा आश्‍चर्यचकित झाले.

हा गुन्हा 13 वर्षे उघडकीस नव्हता आला. पण, 2016 मध्ये तो पोलिसांसमोर उभा राहिला. हा खटला अशा प्रकारे सुरू झाला होता की, साताऱ्यातील वाई येथे राहणाऱ्या 49 वर्षीय अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे या एके दिवशी अचानक गायब झाल्या. बरेच दिवस त्यांचा पत्ता न लागल्याने त्यांचे कुटुंब पोलिसांकडे गेले आणि डॉ. संतोष पोळ याचा सहभाग असल्याची शंका तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केली. संतोष पोळ हा देखील भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ता होता आणि पोलिस ठाण्याच्या प्रभारीविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा उघडकीस आणला होता. पोलिसही त्याच्यावर हात टाकण्यास टाळाटाळ करीत होते. पण, नंतर दबाव वाढल्यावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले.

याच चौकशीदरम्यान डॉ. संतोष पोळ याने पोलिसांना फिरवून सांगितले, की मंगला जेधे बेपत्ता होण्यात त्याचा हात नव्हता. पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्याची सुटका करण्यात आली. यानंतर पोलिसांनी मंगला जेधेच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली असता तिचा मोबाईल ज्योती मांढरे नावाच्या परिचारिकाकडे असल्याचे समजले. ज्योती डॉक्‍टर संतोष पोळ याच्याकडे काम करायची. यानंतर पोलिसांनी ज्योतीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान ज्योती म्हणाली, की डॉ. संतोष पोळ याने मंगला जेधेचा खून करून त्याच्या फार्महाऊसमध्ये तिला पुरले होते. ज्योतीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी डॉक्‍टर संतोष पोळ याच्या फार्महाऊसमध्ये जाऊन मंगला जेधे यांना दफन केलेल्या जागेचे खोदकाम केले. तिथे नारळाचे झाड असल्याने जेसीबीच्या मदतीने ते काढले गेले आणि जमिनीखालून एक सांगाडा सापडला. धोम परिसरात राहणारा डॉ. पोळ हा शांत वाटणारा, पण तितकाच चलाख माणूस. तो पंचक्रोशीत डॉक्‍टर म्हणून काम करायचा. तो ग्रामपंचायच सदस्य देखील होता.

त्याचसोबत बनावट नोटा विकणाऱ्यांच्या टोळीचा सुगावा त्याने पोलिसांना दिला होता. पोलिसांना योग्य माहिती देण्याचं देखील काम करायचा. सोबत अँटी करप्शनला माहिती देणाऱ्यांमधला तो एक होता. त्यामुळे शासकीय अधिकारी देखील त्याच्यापासून दोन हात लांब असायचे. मात्र, तो असं काही करेल याची कोणालाच कल्पना नव्हती; कारण तो इतका सभ्य होता! फॉरेन्सिक तपासणीत हा सांगाडा मंगला जेधे यांचा असल्याचे उघडकीस आले. यानंतर डॉक्‍टर संतोष पोळ याची तपासणी सुरू झाली. ज्योती पोलिसांसमोर तोंड उघडेल हे त्यांना कळले असल्याने तो यापूर्वीच आपल्या काही नातेवाइकांसह मुंबईच्या दादरला पळून गेला होता. मात्र, 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.

डॉक्‍टर पोळ याचं एक फार्महाऊस होतं. अडीच तीन एकरावर असणारा हा फॉर्महाऊस. असं म्हणतात, की डॉक्‍टरने ही शासनाची जागा फेरफार करून लाटली होती. इथे तो पोल्ट्रीफार्म उभारणार होता. तो लोकांना तसं सांगायचा देखील; पण इथे एकही कोंबडी नव्हती. इथे त्याचं फार्महाऊस आणि दारात नारळाची झाडं आणि त्यासाठी खणलेले खड्डे होते. ते खड्डे का खणले असावेत याची फारशी लोकांना कल्पना नव्हती आणि त्या खड्ड्याविषयी लोकांनीही त्याला कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही. डॉक्‍टर संतोष पोळ याला सातारा येथे आणण्यात आले आणि चौकशी सुरू झाली, ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याने आतापर्यंत सहा लोकांचा खून केला होता, ज्यात पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 2003 मध्ये त्याने पहिला खून केला होता. त्याने सांगितले की, तो आधी आपल्या फार्महाऊसवर उपचाराच्या बहाण्याने लोकांना फोन करायचा आणि मग त्यांना इंजेक्‍शन द्यायचे, जेणेकरून त्यांचे शरीर कार्य करणे थांबवेल. तथापि, त्या वेळी ते लोक तो जिवंत असायचे, त्यानंतर त्याने आपल्या फार्महाऊसमध्ये आधीपासूनच खोदलेल्या खड्ड्यात त्यांना जिवंत पुरले आणि वर एक नारळाचे झाड लावले, जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. हा घटनाक्रम असाच सुरू होता. इथं देवमाणसातला राक्षस जागा होत होता; पण लोकांना या कुकर्माची कोणतीच कल्पना नव्हती.

या पोळच्या कुकृत्यामुळे डॉक्‍टरी पेशाला काळा डाग लागला होता. डॉक्‍टरांची प्रतिमा मलिन होताना दिसत होती. डॉक्‍टरांवर विश्वास ठेवायला कोणी धजावत नव्हते. डॉक्‍टर संतोष पोळ याने पोलिसांना सांगितले, की त्याने आपल्या फार्महाऊसमध्ये पोल्ट्रीफार्म उघडला; कारण त्या मृतदेहांचा दुर्गंध सगळीकडे पसरू नये. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फार्महाऊस खोदून काढले आणि नारळाच्या झाडाखाली पाच सांगाडे सापडले, ते सर्व महिलांचे होते. तर एका पुरुषाचा मृतदेह तलावामध्ये फेकला होता. परंतु तो सापडला नाही. तथापि, डॉक्‍टर संतोष पोळ याने या सर्वांचा खून लूट करण्याच्या हेतूने केला असल्याचा अंदाज होता. पण, ही घटना चित्रपटातील थ्रिलर कथेपेक्षा काही कमी नव्हती. चित्रपटात जसं दाखवलं जातं, तेच वास्तव साताऱ्यातील वाईत घडत होतं. खूपच भयानक आणि धक्कादायक होतं. या घटनेनं अख्खा देश हादरवून गेला होता. कारण, इथं देवच राक्षस बनला होता. डॉक्‍टराकडून असं काही होईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं. हा राक्षस प्रत्येक व्यक्तीला गिळंकृत करत होता, त्याची ना पोलिसांना खबर होती ना गावकऱ्यांना! हा खेळ रात्रीस चालायचा.

या घटनेला आज कित्येक वर्षे होत आली, तरी माणसाच्या मनातील ही जखम आजही तितकीच ताजी आहे. आजही जेव्हा या राक्षसाचा चेहरा समोर येतो, तेव्हा लोकांच्या मनात त्याची दहशत कायम आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2003 ते 2016 या कालावधीत वाई क्षेत्रातून सुमारे 15 जण बेपत्ता झाले होते आणि अशी शंका उपस्थित केली जात आहे, की डॉक्‍टर संतोष पोळ याने हे सर्व लोक बेपत्ता केले असावेत. परंतु अद्यापपर्यंत हे सिद्ध झाले नाही. या खुनांमध्ये परिचारिका ज्योती हिने डॉक्‍टर संतोष पोळला साथ दिली होती. या प्रकरणात तिच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, तिला फक्त मंगला जेधे यांच्या हत्येविषयी माहिती असल्याचे तिने सांगितले. दोघेही सध्या तुरुंगात आहेत आणि हा खटला चालू आहे. सध्या "झी'वर याच कथानकाच्या धर्तीवर "देवमाणूस' ही सिरियल चालू आहे. यापूर्वी क्राईम पेट्रोलमध्ये देखील ही घटना दाखवण्यात आली होती. याच घटनेवर चित्रपट निघण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही; कारण इतकं भयानक "कांड' वाईत घडलंय. वाईकरांनी देवमाणतला राक्षस पाहिलाय आणि अनुभवलाय देखील!