
अधिकार गाजवण्याच्या नादात विश्वरचनेचे उदंड मानचिन्ह माणूस पायदळी तुडवतो आहे. स्वतःच तयार केलेल्या सृष्टीचे स्वतःच तुकडे करतो आहे. उत्क्रांतीच्या तत्त्वात डार्विनच्या सिद्धांताच्या तुपात जशी माशी शिंकली होती अगदी तशीच माशी समाजाचे विरजण बिघडवण्याचा प्रयत्न करते आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जसा या माशीवर झालेल्या प्रयोगानंतर पुन्हा पुन्हा उकलण्यात आला होता तसाच आपला समाज आपल्याला उकलून सुलटा करावा लागणार आहे.
सृष्टीच्या भूतलावर माणसाचा जन्म होणे ही जरी आज आपल्याला सर्वसामान्य घटना वाटत असली तरी त्यासाठी किती प्रकारचे भौगोलिक, रासायनिक, वातावरणीय बदल घडावे लागले असतील, याची आपण आज कल्पनादेखील करू शकत नाही. माणूस उत्क्रांत होत गेला तसे त्याने आपल्या रहस्याचे गूढ उकलण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यातील अनेक प्रयोगांमधून तो स्वतःविषयीचा उत्क्रांतीचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत गेला. तो जेव्हा विस्तारत होता, विकसित होत होता तेव्हाच तो स्वतःसाठीची एक विशिष्ट जगण्याची शैली तयार करीत होता. त्याची ती जगण्याची शैली म्हणजे आपण ज्या समाजात राहतो ती व्यवस्था होय. या व्यवस्थेची सुरुवातच झाली ती जाणिवेच्या स्पर्शाने.