
अमेरिकेच्या चिप उद्योगावर पकड बसवायचा हट्ट सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी धरलं आहे. कधी टॅरिफची भिंत उभारून तर कधी एनव्हिडिया आणि एएमडीसारख्या चिप क्षेत्रातील दिग्गजांशी गूढ सौदे जुळवून ते या दिशेने पुढं जाऊ पाहत आहेत. या महाकाय महत्त्वाकांक्षेच्या केंद्रस्थानी आहेत मायक्रोचिप्स. ॲमेझॉन-नेट फ्लिक्सची दुनिया चालवणाऱ्या, अणुऊर्जा केंद्रे उजळवणाऱ्या, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि वीजचालित गाड्यांना शक्ती देणाऱ्या, तसेच शेअरबाजाराला झपाट्याने धावायला लावणाऱ्या मायक्रोचिप्स. काही नॅनोमीटरमध्ये मावणारी ही संगणकीय शक्ती राष्ट्रांच्या उदयास्ताचे नवीन कारक म्हणून पाय रोवत आहे.
नॅनोमीटर म्हणजे काय तर सूक्ष्मतेचं शिखर, एका मीटरचा अब्जावा भाग. मानवी केसाचे जाडीला हजार तुकडे केले, तर त्यापैकी एक तुकड्याचं हजारावं म्हणजे नॅनोमीटर! जणू संपूर्ण पृथ्वीला गोल धरलं, तर नॅनोमीटर म्हणजे एका संत्र्याच्या सालाइतकं. या मायक्रोचिप्सभोवतीच आज अमेरिका-चीन तंत्रयुद्धाची नवी रणांगणं सजली आहेत. म्हणूनच ट्रम्प जाहीरपणे त्याचं वर्णन ‘एकविसाव्या शतकाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मूळ’ अशा शब्दांत करतात. हे सर्व ऐकायला मजेशीर असलं, तरी या डावपेचांमुळं चीनला वरचढीची संधी मिळू शकते आणि पाश्चिमात्य वर्चस्वच डळमळू शकतं, याची दखल घेण्याच्या मनःस्थितीत ते दिसत नाहीत.