

Indian stock market
esakal
आज शेअर मार्केट कसे आहे? उत्तर येते, आज ‘सेन्सेक्स’ अमुक-अमुक आहे. अर्थात, शेअर मार्केट किंवा शेअर बाजार म्हणजे ‘सेन्सेक्स’ हे समीकरण दृढ झाले आहे, इतकी या ‘सेन्सेक्स’ची विश्वासार्हता आहे. ‘सेन्सेक्स’ हा ‘बीएसई’ म्हणजेच मुंबई शेअर बाजाराचा इंडेक्स अथवा निर्देशांक आहे. आता ‘सेन्सेक्स’ ४० वर्षांचा झाला आहे. या ४० वर्षांत ‘सेन्सेक्स’ आणि बाजारामध्ये काय बदल झाले, त्याच्या रंजक प्रवासाचा थोडक्यात आढावा...
मुंबई शेअर बाजाराचा इंडेक्स अथवा निर्देशांक ‘सेन्सेक्स’चे मूळ वर्ष १९७९ वर्ष असले तरीही ‘सेन्सेक्स’ची सुरुवात एक जानेवारी १९८६ पासून झाली, ज्या दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ५४९ अंशांवर बंद झाला होता. आज ‘सेन्सेक्स’ ८५,००० अंशांचा टप्पा पार करून, एक लाख अंशांच्या दिशेने वाटचाल करत आहे. तुम्ही ‘सेन्सेक्स’मध्ये एक जानेवारी १९८६ रोजी १० हजार रुपये गुंतविले असते, तर आज त्याचे १५,७०,००० रुपये झाले असते आणि एक लाख रुपयाचे तब्बल १.५७ कोटी रुपये झाले असते. १९८६ पासून आतापर्यंत १५,७०० टक्के सरळ व्याज (ॲबसोल्यूट) परतावा किंवा १३.४ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा मिळाला आहे. चलनवाढीपेक्षा; तसेच पारंपरिक बँक आणि पोस्ट ऑफिस यांच्या मुदत ठेवींपेक्षा हा परतावा कितीतरी जास्त आहे. इतर मालमत्ता विभाग तर सोडाच; परंतु, बहुतेकांना प्रिय असे सोने, ज्याचा गेली दोन वर्षे मोठा बोलबाला आहे, त्यानेसुद्धा यापेक्षा कमी म्हणजे ४० वर्षांत साधारणपणे ११ टक्के परतावा दिला आहे. भारताची नॉमिनल जीडीपी ४० वर्षांत साधारणपणे १२ टक्के वाढ दर्शविते, म्हणजेच ‘सेन्सेक्स’ हा बाजाराचा; तसेच आपल्या अर्थव्यवस्थेचा एकप्रकारे आरसाच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने मागील ४० वर्षांत काय प्रगती केली, ते पाहायचे असेल, तर ‘सेन्सेक्स’ने काय प्रगती केली ते पाहणे इष्ट ठरते.