

Sharankumar Limbale Literary Journey
esakal
ट्रोल संस्कृतीतून लेखकांवर दबाव
पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची नुकतीच निवड झाली. त्यांच्या जवळपास पाच दशकांच्या लेखन कारकिर्दीचा, संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा या निवडीने सन्मान झाला. यानिमित्त त्यांचा लेखनप्रवास, त्यामागील अंतःप्रेरणा, मराठी साहित्यातील कंपूशाही, आजचा सामाजिक भवताल आदींविषयी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.
आंबेडकरी चळवळीत आज ट्रोल करणाऱ्या माणसांची संख्या वाढली असल्याची खंतही शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केली. ‘‘या ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना मी चळवळीसाठी त्याग केला, याची कल्पना नसते. फक्त मोबाईल हातात घेऊन ट्रोल करणे, एवढेच त्यांचे काम असते. माझ्या विरोधी गटातील काही लेखक त्यांना फूस लावतात. मात्र मी कोणत्या व्यासपीठावर जावे, कुठे बोलावे, हे इतरांनी ठरवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. मी माझे स्वातंत्र्य ट्रोल करणाऱ्यांच्या हाती देणार नाही,’’ अशी भूमिका डाॅ. लिंबाळे यांनी स्पष्ट केली.
प्रश्न : साहित्य संमेलनाशी तुमचं नातं वैशिष्ट्यपूर्ण आहे. २०१५मध्ये तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, नंतर संमेलनापासून अंतर राखलं, संमेलन आयोजित करणाऱ्या महामंडळावर टीकाही केली. या नात्याबद्दल काय सांगाल?
डॉ. शरणकुमार लिंबाळे : साहित्य संमेलनाचं आयोजन करणारे काही कारभारी आहेत. त्यांच्या मनात जसं येतं, तसं ही संमेलनं चालतात. कुणाला बोलवायचं, विषय काय ठेवायचे, संमेलन कुठे घ्यायचं आणि अध्यक्ष कुणाला करायचं, हे ते ठरवतात. खरं तर या कारभारी मंडळींची मी मनःपूर्वक स्तुती करतो; कारण त्यांनी संमेलनाची परंपरा शंभराव्या संमेलनापर्यंत आणली आहे. ही उत्सवप्रेमी मंडळी नसती, तर ही परंपरा टिकली नसती. सतरंजी उचलणं, मंडप घालणं, जेवणावळी देणं, लेखकांना निमंत्रण देणं, त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करणं हा प्रचंड व्याप आहे व तो साहित्य संस्थांनी उचलला आहे. संमेलनं झाली नसती, तर ज्ञानाची फार मोठी गंगा आटली असती, ज्ञानाची चळवळ थांबली असती. लेखक आणि साहित्यिक संस्था हे भाषा आणि संस्कृतीचे पहारेकरी आहेत. या संस्था जितक्या टिकून राहतील, तेवढं भाषेचं काम पुढे जाईल. भाषेचं काम करण्यासाठी सरकारची गरज नाही; साहित्य संस्थांची आणि लेखकांची गरज आहे.