

Systematic Investment Plan
esakal
कृष्ण जोशी - joshikri@gmail.com
शेअर बाजारात चढ-उतार येणे हा नियम आहे; त्याचा फायदा आपण घ्यायला हवा. ‘मला माहीत नाही, मला काय त्याचे’ अशी आपली गुंतवणूक असावी. त्यासाठी म्युच्युअल फंडात ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) माध्यमातून वैविध्यपूर्ण
गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते, असे मत डीएसपी म्युच्युअल फंडाचे एमडी व सीईओ कल्पेन पारेख यांनी व्यक्त केले. खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.
प्रश्न : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असताना गुंतवणूकदारांनी काय करावे?
पारेख : गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांचे एक ते वीस वर्षांसाठी विशिष्ट उद्दिष्ट असते. शेअर बाजाराबाबत येणाऱ्या बातम्या, तज्ज्ञांची मते ही गुंतवणूकदारांना त्या लक्ष्यापासून विचलित करतात. मी १९९८ पासून शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू केली. तेव्हापासून सतत शेअर बाजारात चढ-उतार होत आले आहेत. किंबहुना, चढ-उतार हा शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. वर्ष १९९८, २००४, २००८, २०१२, २०२० आणि आजही शेअर बाजारात चढ-उतार आहेत. यात नवे काहीच नाही, त्यामुळे त्याच्या मुळाशी जात बसू नका. जो गुंता कधीच सोडवता येणार नाही, ज्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत. जसे, ‘शेअर बाजारात चढ-उतार का आले?’ त्याची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो; मात्र ते करण्याची अजिबात गरज नाही. समजा, अमेरिका-इराण युद्ध ऐन भरात असताना मी तुम्हाला असे सांगणार असेन, की या टप्प्यापासून शेअर बाजार तेजीत जाईल, तर मला आत्मविश्वास हवा की युद्ध थांबेल, कच्च्या तेलाचे भाव कमी होतील; पण तो आत्मविश्वास अमेरिका, इराण किंवा इस्रायल यांपैकी कोणालाच नव्हता. तरीही तज्ज्ञ लोक आत्मविश्वासाने आपली मते मांडतात. आदर्श गुंतवणूक करताना आपल्याला हे जाणून घेण्याची गरजच नसते.
प्रश्न : अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी कशा प्रकारची गुंतवणूक करावी?
पारेख : ‘‘I Don’t Know, I Don’t Care’’ (IDK-IDC) म्हणजेच ‘मला माहित नाही, मला काय त्याचे,’ अशा दृष्टिकोनातून केलेली वैविध्यपूर्ण गुंतवणूक हा योग्य मार्ग आहे. ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक आणि मल्टी-अॅसेट फंडामध्ये गुंतवणूक करून पुढे काय होणार आहे, हे मला माहीत नाही आणि मला ते आता समजून घेण्याची गरजही नाही, अशी वृत्ती अंगीकारू शकाल. मी माझी रोजची भाकरी कमावण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करेन. खरे सांगायचे, तर कोणी आम्हाला भविष्याचा कल विचारला, तर अर्ध्या वेळा आम्ही मागच्या वाटचालीवरून सध्याची परिस्थिती पाहून अंदाजच बांधत असतो.