
Shivaji Maharaj Navy
esakal
शिवाजी महाराज हे दुर्गबांधणीचे थोर निर्माते होते. आबे कारे नावाच्या प्रवाशाने १६७३ मध्ये चौल येथील मराठा सुबादारास भेट दिली. त्या संभाषणात सुबादाराने आपल्या स्वामीविषयी असे म्हटले : ‘‘जगातील एक भाग जिंकण्यासाठी सेनापती आणि सैनिकाचे कर्तव्य काय, याचा त्याने अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला आहे; आणि विशेषतः: दुर्गबांधणीच्या कलेविषयी त्याच्याकडे असे प्रभुत्व आहे की, सर्वश्रेष्ठ अभियंत्यांनाही त्याची बरोबरी करता येणार नाही.’’
१६७७मध्ये कर्नाटक जिंकल्यानंतर जिंजी आणि इतर दुर्गांच्या जीर्णोद्धाराबाबत, अँद्रे फ्रेइर या जेझुईट धर्मप्रचारकाने असे लिहिले :
‘‘जिंजीचे राज्य जिंकल्यानंतर... भारतातील मुसलमानांचे सामर्थ्य किती प्रचंड आहे हे जाणणारा, दूरदृष्टी आणि अनुभवी पुरुष म्हणून, शिवाजीने त्यांच्या संपूर्ण शक्तीला भविष्यात रोखण्यासाठी स्वतःची दुर्गरचना मजबूत करण्यास आरंभ केला. जिंजीचा किल्ला नैसर्गिकदृष्ट्या अजिंक्य असूनही त्याने तो अधिक भक्कम केला. दुर्गाच्या अनेक भिंती पाडून, नवे बुरूज बांधून तो पुन्हा उभारला; एवढे कुशलतेने की तो जणू युरोपियांनी उभारलेला दुर्ग वाटावा. त्यानंतर या संपूर्ण राज्यात, जे दुर्ग त्याच्या मते निरुपयोगी होते ते त्याने जमीनदोस्त केले, तर नवे किल्ले मैदानी प्रदेशात तसेच डोंगरकपारी आणि दुर्गम शिखरांवर उभारले. युरोपीय पद्धती अनुसरून त्याने प्रचंड दगड फोडले, पाणवठे (तळी) तयार केले, इमारती उभारल्या आणि युद्धासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या.’’