

Panhala Victory
sakal
केदार फाळके- editor@esakal.com
दुसरा अली आदिलशाह याचा २४ नोव्हेंबर १६७२ रोजी मृत्यू झाला आणि त्याचा चार वर्षांचा मुलगा सिकंदर गादीवर आला. राज्यकारभाराची सर्व सूत्रे खवासखानाच्या हाती गेली; परंतु त्याने इतर सरदारांशी सत्ता वाटून घेण्यास नकार दिल्याने आदिलशाही सल्तनतीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. या अस्थिर परिस्थितीत शिवाजी महाराजांनी १६६७पासून आदिलशाहीशी जो शांततेचा तह सुरू होता त्याला मुरड घालून आपला राजदूत बाबाजी पुंडे यास विजापूराहून परत बोलाविले. पुढील काही वर्षे ते मुघल आघाडीवर आघात करत राहिले, त्याचबरोबर त्यांनी आदिलशाही जिंकून घेत आपल्या राज्याचा विस्तार सुरूच ठेवला. जोरदार आक्रमणांना प्रारंभ करण्यास मात्र काही काळ जावा लागला.