

Shivaji Maharaj Coronation
esakal
शेकडो गडकोटांचे, जलदुर्गांचे आणि विशाल सेनेचे आधिपत्य सांभाळणारे शिवाजी महाराज त्या काळात हिंदू प्रजेच्या श्रद्धा, आशा आणि स्वाभिमानाचे प्रतीक झाले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रजेने आपल्या भाग्याचा निर्माता पाहिला. भूषणासारखा कवी त्यांना ‘हिंदुपती पातशाह’ संबोधू लागला. एवढे विशाल आणि संघटित राज्य निर्माण होऊनही शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झालेला नव्हता—आणि हाच त्या काळातील सर्वांत मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अपूर्णांक होता. दिल्ली, चितोड, कर्णावती, देवगिरी, विजयनगर, वारंगळ या महान सिंहासनांचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर भारतात कोणत्याही हिंदू शासकाचा सार्वभौम राज्याभिषेक झाला नव्हता. या दृष्टीने ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ ही केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक पुनर्जागरणाची घटना होती.
शिवाजी महाराज मुघलांचे मनसबदार नव्हते आणि कोणत्याही इस्लामी सत्तेचे मांडलिकही नव्हते; परंतु त्यांच्या सार्वभौमतेला औपचारिक मान्यता नव्हती. मुघल आणि दख्खनी सत्तांसाठी ते एका जमीनदाराचा पुत्र, युरोपियांसाठी बंडखोर सेनानी आणि हिंदूंसाठी मुक्तीचा प्रतीक ठरलेला नायक होते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या वतन आणि इनामांना तसेच केलेल्या तह आणि करारांना कायदेशीर स्वरूप येण्यासाठी त्यांचा विधिवत राज्याभिषेक आवश्यक होता. प्रत्यक्षात, शिवाजी महाराजांची कारकिर्दीच्या प्रारंभीपासून उक्ती आणि कृती स्वतंत्र शासक म्हणून राहिली होती. त्यांच्या उपलब्ध पत्रांपैकी पहिले पत्र २८ जानेवारी, १६४६ या तारखेचे असून त्यावरील संस्कृत मुद्रा या गोष्टीची साक्ष देते.