
Maratha army
esakal
सतराव्या शतकातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिवाजी महाराजांना सैन्य व्यवस्था निर्मितीस सुरुवात करावी लागली. त्यांना ॲलेक्झांडरप्रमाणे बापाकडून मिळालेल्या सेनेसारखे बलाढ्य सैन्य वारशात मिळाले नव्हते किंवा नेपोलियनप्रमाणे सुसंघटित राष्ट्राची साथ मिळाली नव्हती. त्यांनी फक्त एक सैन्यच उभारले नाही, तर त्या प्रक्रियेतून सशक्त राष्ट्राचीही निर्मिती केली.
शिवाजी महाराजांचे सैन्य दोन प्रमुख भागांत विभागलेले होते—घोडदळ आणि पायदळ. घोडदळ दोन प्रकारचे होते ः बारगीर किंवा पागा हे असे सैनिक होते, ज्यांना घोडे, शस्त्रे आणि साहित्य सरकार पुरवीत असे; आणि शिलेदार जे स्वतःचे घोडे आणि साहित्य घेऊन येत. शिवाजी महाराजांचा मुख्य भर बारगीर घोडदळावर होता. सभासद बखरीत नमूद केले आहे ः ‘‘पागेची ताकद शिलेदारांपेक्षा श्रेष्ठ होती. शिलेदारांना पागेच्या आधिपत्याखाली ठेवण्यात आले.’’