
श्रीशिवछत्रपती भारत भाग्यविधाता
अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज वाईला आले. नेतोजी पालकरांस अफजलखानाच्या वाईमधील तळावर हल्ला चढविण्यास सूचित केले होते, मात्र त्यांनी ही कामगिरी चोख पार पाडली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, फाजिलखान, मुसेखान, आणि इतर काही आदिलशाही सरदार विजापूराला पळून जाण्यात यशस्वी झाले.
शिवाजी महाराजांच्या हातून अफजलखान मारला गेल्यामुळे आदिलशाहीत जी अव्यवस्था निर्माण झाली, त्याचा महाराजांनी पुरेपूर फायदा उठविला. त्यांनी नेतोजी पालकरांना आदिलशाही प्रदेश जिंकण्याकरिता पाठवून दिले आणि ते स्वतः बलाढ्य सैन्य घेऊन कोल्हापूर-पन्हाळ्याच्या दिशेने निघाले. त्यांनी कराडच्या वायव्येस असणारा वसंतगड जिंकून घेतला. तत्पूर्वी अफजलखान मारला गेल्यामुळे त्याचे सरदार नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, नाईकजी खराटे, सिद्दी हिलाल हे शिवाजी महाराजांना येऊन मिळाले.