

Prataprao Gujar
esakal
जूनमध्ये नारायण शेणवी रायगडाला गेला आणि सप्टेंबर अखेरीस परतला. त्या दरम्यान कंपनीच्या कारवार येथील वखारीला बंडखोरांनी वेढा दिल्याने व्यापार विस्कळित झाला. त्यामुळे मुंबई कौन्सिलास राजापूर हे पर्यायी केंद्र म्हणून महत्त्वाचे वाटले. याकरिता जप्त केलेले राजापुरातील व्यापाऱ्यांचे जहाज परत न करणे म्हणजे शिवाजी महाराजांना डचांशी तह करण्यास प्रवृत्त करणे ठरेल, असा विचार करून २१ ऑगस्ट, १६७३ रोजी ते परत देण्याचा निर्णय झाला. सूरत कौन्सिलाने मात्र या निर्णयाला विरोध केला; परंतु मुंबई कौन्सिलाने राजापुराचे व्यापारी महत्त्व अधोरेखित करीत आपला निर्णय कायम ठेवला.
१५ सप्टेंबर १६७३ रोजी रायगडावरून परतलेल्या नारायण शेणवीने कळविले की, महाराजांनी इंग्रजांशी वाद मिटविण्याची तयारी दर्शवून ७,००० होन देण्याची तयारी दाखविली आहे, जी रक्कम युद्धामुळे सध्या न देता राजापूर सीमाशुल्कातून वसूल होईल. सप्टेंबरअखेरीस नारायण शेणवी आणि भीमाजी दोघेही मुंबईला परतले.