
समाजमाध्यमाच्या युगात ‘शोले’च्या विडंबनात्मक पोस्ट, मिम्स, एआय रिमिक्स यांचा भरपूर मारा दिसतो. पन्नास वर्षांपूर्वी मुठीत घट्ट धरलेले सुट्टे पैसे तिकीट खिडकीतून आत टाकून त्याच वेगात मुठीत गर्द लाल वा हिरव्या- पिवळ्या रंगातील तिकीट पकडून कधी एकदा खुर्चीवर जाऊन बसतोय, यापासून ऑनलाइन बुकिंगपर्यंत या चित्रपटाचा प्रवास सुरूच आहे.
२ ऑक्टोबर १९७३. बंगलोरजवळील रामनगर येथे खरेखुरे गाव वाटावे, असे उभारण्यात आलेल्या रामगढ या गावाच्या सेटवर जी. पी. सिप्पीनिर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’च्या मुहूर्ताला चित्रपटातील सगळे कलाकार, तंत्रज्ञ हजर होते. पटकथा लेखक सलीम- जावेद यांच्याकडून आलेल्या संवाद लेखनानुसार चित्रीकरण सुरू होत होते; पण सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आणि हा मुसळधार पाऊस थांबण्याचे नावच घेईना.
पहिल्याच दिवसाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर १९७३ रोजी ‘शोले’च्या मुहूर्त दृश्यासाठीची तयारी झाली. रमेश सिप्पींनी सायलेन्स... कॅमेरा... ॲक्शन म्हटले. कॅमेऱ्यासमोर क्लॅप धरण्यात आली.