The Kudus Attack: A Turning Point for the Shramajivi Sanghatana
Esakal
विवेक पंडित
आजवर जे आपल्याला राबवत होते, नाडत होते त्यांना संघटनेच्या बळावर ‘पळता भुई थोडी’ करता येऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव कुडूसच्या हल्ल्याने कार्यकर्त्यांना दिला... सुट्या सुट्या सभासदांनी एकत्र येऊन बनलेल्या संघटनेत आता एकजिनसीपणा आला... ‘मी आणि माझ्या संघटनेचा कार्यकर्ता’ असा दुजाभाव कार्यकर्त्यांच्या मनातून आता संपला. ‘दुरितांचे तिमिर जावो’ इथून सुरू झालेली संघटना,
या हल्ल्यानंतर ‘भूतां परस्परे
जडो मैत्र जीवांचे’ इथवर पोहोचली होती.
मार्च १९८८ रोजी श्रमजीवी संघटनेचे अधिवेशन भिवंडी-वाडा रस्त्यावरील कुडूसमध्ये सुरू होत होते. संघटनेच्या स्थापनेपासून नियमाप्रमाणे दरवर्षी संघटना सर्वसाधारण सभासदांची वार्षिक सभा आणि अधिवेशन एकत्रित बोलावत असे. कुडूसचे हे अधिवेशन संघटनेचे सहावे अधिवेशन होते. पहिल्या वर्षी केवळ अठ्ठ्याऐंशी सभासद अधिवेशनाला उपस्थित होते. आता संघटना वसई तालुका सोडून भिवंडी, वाडा, शहापूर तालुक्यातही विस्तारू लागली होती. संघटनेचे तीन हजारांहून अधिक सभासद झाले होते. प्रत्येक कार्यकर्त्याने त्याच्या गावात किमान वीस जणांना एकत्र करायचं, त्यांना संघटनेचं सभासदत्व द्यायचं, त्यांना संघटित करायचं... वार्षिक फी दिल्यानंतरच त्यांना संघटनेचं सभासद करायचं. वार्षिक फी साधारणपणे किमान वेतनाच्या जवळपास असावी, असं ठरवण्यात आलं होतं. सुरुवातीची सभासद फी पाच रुपये होती. १९८८ मध्ये ती वाढवून सात रुपये करण्यात आली होती. अधिवेशनाला येणाऱ्यांचं प्रमाण आता वाढलं होतं.