
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
तुरुंगातून बाहेर आल्यावर आम्ही आमची संघटना स्थापन केली. संघटना आदिवासींची असावी, पण कोणा एका जातीसाठी नसावी असं ठरलं. आम्ही कष्टकरी अन् श्रमजीवी वर्गाला संघटित करण्याचा विचार करीत होतो. अनेक नावं चर्चेत समोर आली. अंती ‘श्रमजीवी संघटना’ नावावर सर्वांचं एकमत झालं. ‘श्रमजीवी संघटना जिंदाबाद’चा नारा १२ ऑगस्ट १९८२ रोजी पहिल्यांदा दहिसर गावात घुमला. ‘जिंदाबाद’ म्हणताना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येत जिंकण्याचा एक बारीकसा कवडसा पकडण्याचं सामर्थ्य मनात येतं. त्यामुळे ‘जिंदाबाद’ संघटनेचा मंत्रच झाला.
रामकिसन रेणगुटवार यांनी आमच्यासाठी खाण्याकरिता मागवलं आणि मला म्हणाले, ‘बघा, तुम्ही चांगलं काम करता आहात, पण जरा सांभाळून राहा... तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आमदारांसह वामन पाटील व इतर आले होते; पण तुम्ही सांगायच्या आधीच काय झालं असेल ते माझ्या लक्षात आलं. मी राजकीय दडपणाला घाबरत नाही...