
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
यंत्रणांमध्ये आमच्या संघटनेचा एक दरारा निर्माण झालेला होता. संघटनेने आदिवासींना संघटित करण्यासोबतच त्यांच्यातील तरुणांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलं होतं. शिबिरांतून बाहेर पडलेला, लिहिता-वाचता न येणारा आदिवासीही मग यंत्रणांना थेट भेटू लागला. निर्भीडपणे आणि योग्यरीतीने फिर्याद मांडू लागला.
मारहाण झाल्यावर पोलिसाकडे जायचं, जमीन-घरातून बेदखल केल्यावर मामलेदार कचेरीत जायचं, आदिम निवासी म्हणून प्राप्त अधिकारांवर टाच आल्यावर वन खात्याकडे जायचं, हे त्याला समजू लागलं होतं. संघटना केवळ विस्तारत नव्हती, तर ती प्रगल्भ होत होती आणि सोबत आम्हीही...
प्रभू सरांचा ‘शिस्तीचे शिक्षक’ म्हणून दरारा होता. त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेण्याचं ठरवलं. ‘निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही,’ असं त्यांनी ठरवलं असल्याने संघटनेच्या प्रशिक्षणाची ही जबाबदारी त्यांनी अनौपचारिकपणे घेतली...