Premium|Thane labour movement case : स्वतःच्या झाकूनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही...

False Murder Case Allegation : खोट्या खुनाच्या आरोपांमुळे संघटनेवर आणि कार्यकर्त्यांवर मोठे संकट कोसळले. अटक, जंगलातील लपून राहणे आणि संघटना वाचवण्याचा संघर्ष यांची हृदयस्पर्शी कहाणी या घटनांमधून उलगडते.
Thane labour movement case

Thane labour movement case

esakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजींची प्रार्थना आयुष्यभर हृदयाशी कवटाळणाऱ्या मला खुनाचा आरोपी म्हणून पोलिस ठाण्यात हजेरी लावताना सत्य, अहिंसा, बंधुभाव, प्रेम ही सारी तत्त्वं स्वतःला निर्दोष ठरविण्याच्या धडपडीत पुन्हा पुन्हा विरोधाच्या गलिच्छ प्रतलावर आदळत होती... या उपेक्षित एकाकी काळात कित्येकदा वाटले, की साने गुरुजींना कायमचं कवटाळावं...

श्रमजीवी संघटनेच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी त्या वेळच्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट झाली. संघटनेला आणि प्रामुख्याने मला घेरण्यासाठी, संघटना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मला आयुष्यातून उठवण्यासाठी जे जे काही करता येणं शक्य असेल ते ते सर्व या वर्षभरात केलं गेलं. माझ्याविरोधी खुनाचा कट केल्याचा आरोप लावून गुन्हा दाखल केला गेला. हे प्रत्यक्षात जेव्हा मला कळलं तेव्हा मी अमेरिकेत एका परिषदेसाठी गेलो होतो. दोन आठवड्यांनंतर २१ मे १९९६ रोजी मी परत आलो; परंतु तोपर्यंत संघटना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांना हाताशी धरून संघटनेच्या विरोधकांनी केला होता. संघटनेची कार्यकर्ती पारोमिता गोस्वामीकडे माझ्या गैरहजेरीत न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याची आणि जामिनाच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सुरुवातीच्या आठवड्यातच संघटनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला. या सुनावणीच्या दरम्यान माझी पत्नी विद्युल्लता, रामभाऊ वारणा, कोंडू सांबरे, बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांना सुरुवातीच्याच सुनावणीत अटकपूर्व जामीन दिला गेला. नंतरच्या सुनावणीमध्ये अनेकवेळा बजरंग वळवी, संतोष भोईर, रामचंद्र मोकाशी आणि वसंत पाटील यांचे मात्र जामीन फेटाळण्यात आले. त्यानंतरच्या सुनावणीदरम्यान वेणूबाई मेघवाले आणि पारोमिता गोस्वामी यांना आरोपी बनविण्यात येऊन अटकपूर्व जामिनावर त्यांचीही मुक्तता झाली. गुन्हा दाखल होताच, चारही बाजूंनी संघटनेवर आणि व्यक्तिशः माझ्यावर आक्रमणं सुरू झाली. ५ मे १९९६ रोजी सकाळी अटक दाखवली असली, तरी ज्यांना मारहाण झाली होती ते पंढरीनाथ बर्डे आणि लक्ष्मण मेढा यांच्या घरी विरारचे पोलिस ४ मे रोजीच रात्री एक वाजताच पोहोचले होते. त्यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी रात्री एक ते दीडच्या सुमारास अटक केली. संघटनेचे नेते जानू मेघवाले आणि महादू जाबर यांनासुद्धा त्याच रात्री अटक करण्यात आली. स्वाभाविकपणे आता पोलिस आपल्या सर्वांना अटक करतील, अशी भीती संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तातडीने एकत्र येऊन पोलिसांच्या हाती आपण लागू नये आणि संघटना वाचवावी यासाठी जीवतोड प्रयत्न करण्याचा निर्णय केला. बजरंग वळवी आणि संतोष भोईर मेढ्याला संतोषच्या घरात असतानाच पोलिसांची गाडी संतोषच्या घरासमोर येऊन थांबली. संतोष आणि बजरंग मागच्या दरवाजातून निघून शेतात जाऊन लपले. पोलिसांनी संतोषच्या घराला घेराव घातला. बराच वेळ ते दोघे घराच्या बाहेर येत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं; परंतु त्या दोघांच्याही चपला घराच्या बाहेर होत्या त्यामुळे ते आजूबाजूला असतील, असा कयास करून पोलिसांनी शेताच्या दिशेने जायला सुरुवात केली. पोलिस आपल्या दिशेने येत आहेत हे पाहून संतोष आणि बजरंग यांनी जीवाच्या आकांताने धावण्यास सुरुवात केली. ते दोघे पुढे आणि पोलिस मागे, असं बराच काळ चालल्यानंतर पोलिस थकले. संतोष आणि बजरंग मेढ्याच्या जंगलात डोंगरावर उंच ठिकाणी जाऊन राहिले. रामभाऊ वारणा, कोंडू सांबरे, बाळाराम भोईर, विजय जाधव इत्यादी सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिले. हे सारे अटकेच्या भयाने पळत-लपत नव्हते; तर सगळेच प्रमुख कार्यकर्ते जर तुरुंगात गेले तर संघटना कोलमडून पडेल... स्वतःच्या जगण्याच्या चिंतेपेक्षा संघटनेला जिवंत ठेवण्यासाठी हे धडपडत होते. याच विचाराने अनेक दिवस ते या जंगलातून त्या जंगलात असे जंगलाच्या परिसरातच फिरत राहिले. रामभाऊ वारणा, कोंडू सांबरे, बाळाराम भोईर, विजय जाधव यांना आरोपी केलेलं नाही, असं कळताच हे सारे आणि विद्युल्लता यांनी एकत्र येऊन आता या आक्रमणाला कसं थोपवायचं, याचा विचार केला. भूमिगत असणारे बाकी सर्व कार्यकर्ते सुरुवातीला मेढ्याच्या जंगलात, नंतर भाताण्याजवळच्या हातीपाड्याच्या जंगलात, त्यानंतर पालघरजवळच्या बहिरीपोंड्याच्या जंगलात असे पोलिसांचा ससेमिरा चुकवत राहिले. गावातले गावकरी यांना जेवण पुरवत असत. एकदा रात्रीच्या वेळी गावचे संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत असणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवण देण्याकरिता जात असताना बजरंग वळवी, कोंडू सांबरे या कार्यकर्त्यांना ‘पोलिसच आपल्याला पकडण्यास आले असावेत’ असं वाटून त्यांनी डोंगरावर असणारे हाताला लागतील ते दगड खाली लोटायला सुरुवात केली. दगड आपल्या दिशेने येताना पाहून खालून कार्यकर्त्यांनी जिंदाबादचा नारा द्यायला सुरुवात केली. तेव्हा डोंगरावर असलेल्यांना कळलं, की हे आपले संघटनेचेच लोक आहेत... असे अनेक जीवघेणे प्रसंग कार्यकर्त्यांनी या काळात अनुभवले. मिळेल तिथे जंगलात हे सारे भूमिगत कार्यकर्ते झोपत राहिले. जे मिळेल त्यावर भूक भागवत राहिले. उपाशीपोटी राहून प्रत्येक रात्री वेगवेगळ्या जंगलात मिळेल तिथे पथारी पसरून राहू लागले. मनात सतत पोलिसांचं भय... इतक्या कडव्या संघर्षाने बांधलेली संघटनेची मोट कोसळून पडेल की काय, याची चिंता...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com