Maharashtra technical Education
Esakal
प्रा. श्रीधर वैद्य, सचिव, ‘टॅफनॅप’
‘टीचर्स असोसिएशन फॉर नॉन ॲडेड पॉलिटेक्निक्स’ (टॅफनॅप) ही संघटना तंत्रशिक्षण क्षेत्रामधील भ्रष्टाचाराविरुद्ध गेली अनेक वर्षे लढा देत आहे. तंत्रशिक्षण व्यवस्थेला पुन्हा सशक्त बनवायचे असेल तर सरकारला या क्षेत्रामध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत काही कटू निर्णय घ्यावे लागतील.
महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाची आवड असणारे, परंतु उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपेक्षा थोडी कमी गुणवत्ता असणारे विद्यार्थी शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये जात असत. ही अडचण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ओळखली. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्यातच तंत्रशिक्षणाची सोय व्हावी यासाठी १९८३ पासून स्वयंसहायीत विनाअनुदान तत्त्वावर तंत्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. परंतु या प्रयोगाने अनेक ‘शिक्षणसम्राट’ बनवले. सर्व नियम व कायदे पायदळी तुडवत शिक्षणसम्राटांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांची झालेली भ्रष्ट युती, या साऱ्या कारणांमुळे आज संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तंत्रशिक्षण व्यवस्था मरणासन्न परिस्थितीला पोचली आहे.