
अपेक्षांचे ओझे आणि अंगावर पडलेली जबाबदारी खेळाडूला प्रगल्भ बनवते, अशी आचरेकर सरांची ठाम समजूत होती. म्हणून मग आचरेकर आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या वयापेक्षा जास्त वरच्या खेळाडूंसोबत दोन हात करायला लावायचे. खरा कस आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वरच्या स्तरावर खेळताना लागतो, हे त्यांना माहीत होते. जबाबदारी चांगली असते. ती शिस्तपूर्ण क्रिकेट खेळायला आणि सर्वोत्तम प्रयत्न करायला भाग पाडते, हे आचरेकर सर सांगायचे. हीच जबाबदारी शुभमन गिलवर आहे.
रमाकांत आचरेकर हे पठडीतले आणि फक्त तंत्रावर लक्ष देणारे क्रिकेट प्रशिक्षक नव्हते. ते खेळाडूंना प्राथमिक गोष्टी समजावून द्यायचे आणि मग नैसर्गिकरीत्या फुलायला वाव द्यायचे. जाळ्यात सराव करताना आचरेकर सर सतत खेळाडूला काही ना काही सांगायचे नाहीत. खेळाडू क्रिकेटची संस्कृती पाळतो का, सतत मेहनत करतो का, शिस्त पाळतो का, सतत फक्त संघाचा विचार करतो का, या गोष्टींवर त्यांचे काटेकोरपणे लक्ष असायचे. आचरेकर सर आपल्या विद्यार्थ्यांना सरावाबरोबर सामन्यात खेळायची जास्त संधी द्यायचे.