
गेल्या रविवारी रोलँ गॅरोवर एक अविस्मरणीय सामना झाला. स्पेनच्या कार्लोस अल्काराझने यानिक सिनरचा पराभव करून फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यासाठी त्याला पाच तासांपेक्षा अधिक विक्रमी काळ झगडावे लागले. पाच-पाच सेट आणि हे सर्व सेट कमालीचे रंगतदार. अंतिम सेटमध्ये चुरस असे अनेक सामने या अगोदर झालेले आहेत; पण अल्काराझ आणि सिनर या अंतिम लढतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ खेळच नाही तर यातून जीवनमूल्यांचेही महत्त्व अधोरेखित झाले. लढण्याची ताकद आणि ऊर्जा सदैव कायम ठेवा... शून्यातूनही विश्व निर्माण कसे करता येते, त्याचवेळी हातात आलेले यश कसे हिरावलेही जाते, हे निसर्गाचे कालचक्र असले तरी त्याच राखेतून पुन्हा उभारी घेण्याचे धडेही कसे असतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अल्काराझ आणि सिनर यांच्यातील तो सामना होता.
हिरव्यागार मैदानावरील विम्बल्डनमधील टेनिसमध्ये नजाकत आहे. हार्ड कोर्टवरील टेनिसमध्ये कठोर परिश्रम आहेत; पण लाल मातीच्या कोर्टवरचे टेनिस सर्वात आव्हानात्मक! क्षमता आणि गुणवत्ता तर आलीच; पण स्टॅमिनाचा सर्वाधिक कस येथेच लागतो.