

SIP Investment Planning
esakal
अरविंद परांजपे - asparanj@gmail.com
म्युच्युअल फंडात ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करण्याकडे भारतीय गुंतवणूकदारांचा कल झपाट्याने वाढत आहे. मात्र, केवळ ‘एसआयपी’ सुरू केली म्हणजे आर्थिक उद्दिष्ट साध्य होईलच असे नाही. उद्दिष्ट, कालावधी, गुंतवणुकीची रक्कम, ॲसेट ॲलोकेशन, योजना निवड आणि वेळोवेळी ‘स्टेप-अप’ यांचा योग्य मेळ साधला, तर ‘एसआयपी’ अधिक परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे ‘एसआयपी’ सुरू करण्यापूर्वी काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि त्यानुसार गुंतवणुकीची दिशा ठरवणे महत्त्वाचे आहे.
‘‘तुम्ही आज रोप लावलेत, तरच काही वर्षांनी त्याचा वृक्ष होईल आणि या वृक्षाच्या सावलीत तुम्हाला बसता येईल.’’
भारतीय गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’चे महत्त्व कळले असावे, असे दर महिन्याला वाढत जाणाऱ्या म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’च्या आकड्यावरून वाटते. सध्या सुमारे १० कोटींहून अधिक फोलिओंमधून ३२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे. म्युच्युअल फंडातील एकूण रकमेचे मूल्य ऑगस्ट २०२६ अखेर आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे ८६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी फक्त ‘एसआयपी’मधून केलेल्या गुंतवणुकीची रक्कम सुमारे २० लाख कोटी रुपये एवढी आहे आणि ही रक्कम वाढतच जाणार आहे. परंतु, अनेकदा असे दिसते, की आपला मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सांगण्यावरून, बँक कर्मचाऱ्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किंवा रील्स बघून फारसा विचार न करता आणि पुरेशी माहिती न घेता ‘एसआयपी’ केली जाते. त्यामुळे ‘‘आम्ही एसआयपी केली आहे; पण म्युच्युअल फंडात आमची गुंतवणूक नाही!’’ असे अज्ञानापोटी म्हणणारेही काही जण भेटतात! जसे आयुर्विमा घरोघरी पोहोचला आहे आणि तो आपण घ्यायला पाहिजे, हे सर्वांना माहीत असते; पण विमा हा मुख्यतः जोखीम संरक्षणासाठी आहे, हे माहिती नसते. त्यामुळे तो कोणासाठी, किती रकमेचा घेतला पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची पॉलिसी घ्यावी, यावर फारसा विचार केलेला नसतो आणि माहितीही अपुरी घेतली जाते. थोडेसे असेच ‘एसआयपी’च्या बाबतीतही झाले आहे, असे वाटते. ‘एसआयपी’चा प्रचार खूप झाला आहे; पण योग्य माहिती घेतली, तरच त्यातून अपेक्षित लाभ मिळतील आणि तुमची उद्दिष्टपूर्ती अधिक चांगली होईल. यासाठी ‘एसआयपी’ करण्यापूर्वी हा होमवर्क करा आणि मगच पहिला चेक द्या. तुम्हाला योग्य दिशा मिळण्यासाठी काही प्रश्न पुढे दिले आहेत. त्यांची विचारपूर्वक उत्तरे द्या आणि मगच ‘एसआयपी’ची सुरुवात करा. असे प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही आर्थिक नियोजन करूनच सुरुवात करता. पहिली पायरी ओलांडली, तरच भविष्यात बदललेल्या परिस्थितीनुसार तुमच्या गुंतवणुकीला दिशा देता येईल.