
विक्रम घडतो तेव्हा वाटते, की हा विक्रम मोडणे केवळ अशक्य आहे; पण जाणते खेळाडू म्हणतात, की प्रत्येक विक्रम हा मोडण्यासाठीच असतो. तरीही इतके कसोटी सामने आता आधुनिक जमान्यात कोण खेळेल, सांगता येत नाही.
मला २००९चे ६ आणि ७ एप्रिल हे दोन दिवस चांगले आठवतात, ते दोन कारणांसाठी. पहिले कारण म्हणजे ६ एप्रिल रोजी राहुल द्रविडने मार्क वॉचा १८१ कसोटी झेलांचा विक्रम मोडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ एप्रिलला राहुलला मी वेलिंग्टनला भेटलो होतो. त्याची कहाणीही मजेदार आहे. मला राहुलने संघ राहत असलेल्या हॉटेलला भेटायला बोलावले. फोन नंबर असला तरी मी कोणत्याही खेळाडूला उचलून सरळ फोन करत नाही. तेव्हा व्हॉट्सॲप नव्हते. संपर्क करायला ब्लॅकबेरी मेसेंजर वापरले जायचे. सामन्याचा अहवाल ‘सकाळ’ला पाठवून ठरल्या वेळेला मी राहुलला भेटायला हॉटेलवर पोहोचलो.