

Sonalee Kulkarni Marathi Cinema
esakal
आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com
आपणच आपल्यासाठी काहीतरी वेगळं आणि छान उभं करू, असं सोनालीने ठरवलं आणि त्यातूनच जन्म झाला ‘हिरकणी’चा... लेकराच्या भेटीसाठी गडद मिट्ट अंधारात गड उतरून जाणाऱ्या हिरकणीची ही गोष्ट तिने ध्यास घेऊन तडीस नेली. महाराष्ट्रातल्या तमाम मातांचं प्रतिनिधित्व करणारी हिरकणी मनामनात अजरामर झाली.
‘अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली’... प्रसिद्ध गायिका बेला शेंडेचा सुरीला, मधाळ आवाज... संतूरच्या सुरांची वातावरणनिर्मिती ज्यावर वेगळ्याच विश्वात घेऊन जाणाऱ्या अजय-अतुल यांच्या संगीताचा साज आणि गुरू ठाकूरच्या चपखल शब्दांत सांगायचं झालं, तर रत्नप्रभा लेऊन सोन्यात सजून डायरेक्ट इंद्रपुरीतून खाली... एक अप्सरा येते. पांढऱ्याशुभ्र नऊवारीत अलंकारांनी सजलेली ही अप्सरा तिच्या विभ्रम आणि पदन्यासाने बघणाऱ्यांना मोहीत करते. क्षणात गुणा कागलकरचा फड आणि ‘नटरंग’ सिनेमा सुपरहीट बनवते... थेट पुढच्या आव्हानात्मक भूमिकेसाठी सज्ज होते ही अप्सरा... अर्थात सोनाली कुलकर्णी.