
छोट्या गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारे थ्रिलर, मर्डर मिस्ट्री हा एक वेगळा जॉनर मानला जावा इतके ते वेगळे वाटतात. मोठ्या शहरात आजूबाजूच्या शेजाऱ्यांचं लक्ष नसतं. त्यामुळे बोलणं, चालणं कमी असतं. थ्रिलरसाठी ही पार्श्वभूमी म्हणजे मशागत केलेलं रान आहे; पण छोट्या गावांचं, निमशहरी भागात जीवनाची पद्धत ही नसते. इथे बहुतांशतः सगळे सगळ्यांना ओळखत असतात. कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे हे सर्वांना माहिती असतं किंवा किमान त्याचा अंदाज असतो; पण त्याच वेळेला तिथला निसर्ग, तिथलं वातावरण याची गूढ वाढवण्यात मदत होते. यामुळेच छोट्या गावातील थ्रिलर हा प्रकार गाजला.
‘युनायटेड किंगडम’मध्ये बनलेल्या अशा अनेक मालिका सापडतील. एके काळी त्यांचं प्रमाण एवढं वाढलं, की एडगर राईट या दिग्दर्शकाने त्यावर टीका करून तोच फॉर्म साजरा करणारी ‘हॉट फझ’ ही फिल्मही बनवली होती. शिवाय ‘ब्रॉडचर्च’, ‘मेयर ऑफ ईस्टटाऊन’, ‘शार्प ऑब्जेक्ट्स’, ‘आय नो धीस मच इज ट्रू’ अशा याच जातकुळीतल्या अनेक सीरिज ‘एचबीओ’वर बनल्या आहेत.