

Soundala village caste-free resolution and social equality movement
esakal
रवींद्र सरोदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळे या गावाने ‘जातमुक्त गाव’ असा ठराव केला आणि ते गाव राज्यात चर्चेत आले. गावात जात, पंथ, धर्म, वंश या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. ‘माझी जात मानव’ ही भावना स्वीकारण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण, उत्सवात जातिभेद पूर्णपणे बंद राहील, असा ठराव या गावाने केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुकयातील सौंदाळा हे गाव. शेवगाव-नेवासे राज्यमार्गावर असलेल्या या गावाची लोकसंख्या अडीच हजार आहे. गावाचे क्षेत्रफळ ७०५ शेती हा मुख्य गावचा मुख्य व्यवसाय, तर काही वर्षांमध्ये शेतीला जोड म्हणून दुग्धव्यवसायही समोर आला आहे. इथपर्यंत अन्य गावासारखे चित्र आहे, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे या गावाला वेगळी ओळख मिळाली. आता या गावाच्या ग्रामसभेने नुकताच ‘जातमुक्त गाव’ असा ठराव केला आणि या गावची राज्यभरात चर्चा होत आहे. अन्य गावांनीही सौंदाळ्याचा आदर्श घ्यावा, असा सूरही उमटू लागला आहे.
संविधानाने सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी प्रतिष्ठेचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. तरीही समाजात जातीय भेदभाव, अस्पृश्यता व सामाजिक विषमता आढळून येते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गत ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी; तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून ग्रामपातळीवर सामाजिक एकात्मता व समता प्रस्थापित करण्यासाठी आपले गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्यासाठी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.