esakal | उपेक्षितांचे अंतरंग जाणणारे अण्णा भाऊ साठे
sakal

बोलून बातमी शोधा

उपेक्षितांचे अंतरंग जाणणारे अण्णा भाऊ साठे}

उपेक्षितांचे अंतरंग जाणणारे अण्णा भाऊ साठे

sakal_logo
By
सकाळ वत्तसेवा

डॉ. लीना निकम

‘मी जे जीवन जगतो, पाहतो अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही’ अशी भूमिका घेऊन कष्टकरी, गोरगरीब, दीनदुबळ्या, निरक्षर लोकांचे आयुष्य आपल्या साहित्यात मांडणारे अण्णा भाऊ साठे म्हणजे साहित्य क्षेत्रातील एक चमत्कार आहे.

१ ऑगस्ट १९२० रोजी जन्म आणि १८ जुलै १९६९ रोजी मृत्यू म्हणजे फक्त ४९ वर्षांचे आयुष्य मिळालेल्या आणि केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या या माणसाने ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, १३ लोकनाट्ये, ७ चित्रपट कथा, तीन नाटके, एक शाहिरी पुस्तक, १५ पोवाडे आणि एक प्रवासवर्णन अशा जवळपास ८० पुस्तकांची निर्मिती करावी ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. गरीबी, जातिव्यवस्था, भेदाभेद यामुळे अण्णा भाऊंना शिक्षण घेता आलं नाही पण पुढे साहित्य क्षेत्रात त्यांनी जी प्रचंड कामगिरी केली ती बघता बुद्धिमत्ता कुणाची मक्तेदारी नसल्याचं दिसून येतं.

अण्णा भाऊंच्या लेखनात अद्भुतता, रंजकता अतिशयोक्ती असेलही पण जीवनातील विदारक वास्तव जास्त आहे. रंजन करता करता व्यापक जीवन दर्शन घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथेत आहे. ‘स्मशानातील सोनं’ ही त्यांची गाजलेली कथा. गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला भीमा दगडाच्या खाणीत काम करीत असतो. खाण अचानक बंद होते. उपाशी भीमाला एक दिवस जगण्याचा मार्ग सापडतो. तो स्मशानातील प्रेत उकरून सोनं शोधण्याचं काम सुरु करतो. एका रात्री भीमा पुरलेलं प्रेत उकरत असताना लांडग्यांचा प्रेतावर हल्ला होतो. झुंज सुरु होते. त्या झटापटीत प्रेताच्या जबड्यात भीमाचा हात अडकून बोटे तुटतात. तो कळवळतो आणि बोटं बांधून घरी येतो. त्याच दिवशी खाणीच काम सुरू झाल्याची बातमी त्याला कळते पण बोटे नसल्यामुळे तो कामावर जाऊ शकणार नसतो. धाय मोकलून रडायला लागतो. या कथेत सर्व प्रसंगाचे चित्रण अण्णा भाऊंनी अतिशय समर्थपणे केले आहे.

हेही वाचा: खरंच कोलकत्याच्या अंधारकोठडीमध्ये ब्रिटिशांना कोंडले होते?

त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला तर राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या कादंबरीत भीषण दुष्काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना, दलितांना मदत करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजातील जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी. कोळसेवाला, खाण कामगार, डोअर कीपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या, घरगडी अशा भूमिका आपल्या कथा कादंबऱ्यात साकारणारे अण्णा भाऊ त्या-त्या भूमिका प्रत्यक्ष जगले आणि नंतरच कादंबरीत साकारू शकले. अण्णा भाऊंच्या साहित्याच्या केंद्रस्थानी कष्टकरी माणसे आहेत. त्यामुळेच त्यांच्या साहित्याला वैश्विकता प्राप्त झाली. जर्मन, झेक, इंग्लिश, पोलिश, रशियन, स्लोव्हाक अशा २७ भाषांमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित आहे.

हेही वाचा: पॉर्नच्या निमित्ताने

अण्णा भाऊंच्या जीवनातील आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णा भाऊ केवळ लिहीतच बसले नाहीत तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात भाग घेऊन त्यांनी प्रत्यक्ष झोकून दिले होते. ‘माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ ही अण्णाभाऊंची अतिशय गाजलेली लावणी. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भाषणांनी ते प्रभावित होते. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचेही सक्रिय कार्यकर्ते झाले. १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटा’ पथकाची निर्मिती केली. तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय अण्णा भाऊंनाच जाते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे गीत लिहून अण्णा भाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला आहे. १९४२ मध्ये त्यांनी ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’ लिहिला आणि कम्युनिस्ट शाहीर म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या फकिरा, निळू मांग, मकुल मुलाणी, फुला, नसरु, दादा न्हावी या पात्रांनी साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलं. छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत आपल्या पोवाड्यातून पोहोचवणारे एकमेव शाहीर म्हणजे अण्णा भाऊ.

हेही वाचा: मृत्यूच्या दारात फुलली होती 'सिक्रेट' लव्हस्टोरी

प्रसिद्ध लोकशाहीर लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उमप यांचे ‘फू बाई फू’ हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. यात विठ्ठलरावांनी अण्णा भाऊंविषयी भरभरून लिहिलंय. खरे अण्णा कळतात ते या आत्मचरित्रातूनच. चिरागनगरच्या झोपडीत मोडक्या टेबलावर, तुटक्या खुर्चीत बसून, एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून, समोर मॅक्झिम गॉर्कीचा पुतळा ठेवून अण्णा लिहायचे. जवळच त्यांच्या पत्नी छोटासा संसार घेऊन बसलेल्या असायच्या. सगळंच मोडक होतं पण त्यांचे अक्षर मात्र जराही खोडतोड नसलेलं, स्वच्छ, सुंदर, एकटाकी होतं. सुखवस्तू जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगात कायम वास्तव्य केले आणि त्या जगाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून मांडले. त्यांच्या रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या कथा कादंबऱ्यांच्या अनुदानाचे अमाप असे मानधन तिथल्या बँकेत होते. त्या मानधनाच्या भरवशावर अण्णांना थाटामाटात जगता येणार होतं. याविषयी विठ्ठलरावांनी अण्णांना छेडले असता त्यांनी म्हटले, ‘विठ्ठला, बंगला, मोटर या साधनांचा मला मोह नाही. झोपडीतच दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची भाषा, त्यांचे जीवनमान, तेथील वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढूनताणून काल्पनिक लिखाण होईल पण झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात, थंडीत कशी कुडकुडतात, दुःखांना कशी झेलतात हे मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही रे. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीने मी बिघडून जाईन. गरिबीला विसरून जाईन. सत्य लिखाणाला पारखा होईन. म्हणून मला ते मानधन नको.’

अशा तऱ्हेने फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपवण्यासाठी आपल्या साहित्यातून आणि प्रत्यक्ष कृतीतून आयुष्यभर लढा देणारे अण्णा भाऊ खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचे शिलेदार होते. अण्णा भाऊंना विनम्र अभिवादन!!

go to top